मुंबई – मासिक पाळी सिद्ध करण्यासाठी एका कॉलेजात तब्बल ६७ विद्यार्थिनींना एका भयंकर परीक्षणाला सामोरं जावं लागलंय. या परीक्षणात कॉलेजच्या या विद्यार्थिनींना आपले कपडे आणि आपली अंतर्वस्त्र काढून त्यांचं परीक्षण करण्यात आल्याचं विद्यार्थिनींनी सांगितलं आहे. अहमदाबाद इंग्रजी वृत्तपत्रात याबाबत सर्वात आधी माहिती छापण्यात आली आहे.
मासिक पाळीमुळे नियमांचं उल्लंघन होत असल्याचा कॉलेज प्रशासनाचा दावा आहे. अशात मासिक पाळी सुरु आहे का नाही? हे तपासण्यासाठी कॉलेज प्रशासनाकडून भयंकर प्रकार अवलंबला गेला. ज्यामध्ये मुलींना त्यांचे कपडे आणि अंतर्वस्त्र उतरवण्यास सांगितले गेलेत. यानंतर सर्व पीडित मुलीनीं कॉलेजच्या ट्रस्टीजकडे याबद्दल तक्रार दाखल केलीये.
काय आहे प्रकरण ?
गुजरातच्या भूजमधील हे कॉलेज आहे. २०१२ मध्ये या कॉलेजची सुरवात झालीये. या गर्ल्स कॉलेजमध्ये मुलींसाठी भयंकर नियम आहेत. यामध्ये त्यांची मासीकी पाळी सुरु असताना त्यांना कॉलेजच्या हॉस्टेलमधील स्वयंपाकघरात जाता येत नाही. याचसोबत त्यांना कॉलेज आवारातील कोणत्याही धार्मिकस्थळी जाण्यावर बंदी आहे. धक्कादायक नियम म्हणजे मासिक पाळी आलेल्या विद्यार्थिनींनी कुणालाही स्पर्श देखील करायचा नाही, हा इथला नियम आहे.

या नियमांचं पालन होत नसल्याच्या संशयावरून कॉलेजच्या पर्यवेक्षिका अंजलीबेन यांनी कॉलेज प्रिन्सिपॉलकडे तक्रार केली होती. यावेळी मुलींची तपासणी करण्याचं ठरवलं गेलं. कुणाला मासिक पाळी आहे का? याबद्दल विचारणा करण्यात आली. दोन मुलींनी हात वर केल्यावर बाकीच्या मुलींना स्वच्छतागृहात नेऊन कपडे आणि अंतर्वस्त्र उतरवत परीक्षण करण्यात आलं.
याबाबत पीडित मुलींनी कॉलेजच्या ट्रस्टीजकडे तक्रार केल्यावर महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थिनींच्या पालकांना हा धार्मिक मुद्दा असल्याचं सांगत हे प्रकरण इथेच थांबवण्यास सांगितलंय. याबाबत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही अशीही माहिती समोर येतेय. हा सगळा प्रकार गुजरातमधील भूजच्या ‘श्री सहजानंद गर्ल्स इन्स्टिट्यूट’मध्ये घडलाय.