देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी घेतला राज्य सरकारने हा निर्णय
सध्या देशात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे 17 मे पर्यंत लॉकडाऊन मुदत वाढवण्यात आली आहे. या लॉकडाऊनचा फटका सर्व सामान्य व्यक्ती पासून ते थेट देहविक्री करणाऱ्या महिलांना सुदधा बसलेला आहे. देह व्यवसाय नसल्याकारणाने अक्षरशः उपासमारीची वेळ या महिलांवर आलेली आहे. महिलांची परिस्थिती सुधारण्यासाठी, त्यांना सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी महिला व बालविकास विभाग प्रयत्न करत आहे.
कोरोनाच्या संकटात महिला व बालविकास मंत्री अॅड.यशोमती ठाकूर यांनी विभागाच्या सर्व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना सूचना देऊन देहविक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू तसेच व्यक्तिगत स्वच्छता साधने पुरविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आत्तापर्यंत राज्यातील या व्यवसायातील सुमारे साडेबारा हजार महिलांपर्यंत पोहोचत त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था राज्य शासनाच्या माध्यमातून केली जात आहे.
