देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज्यपाल कोश्यारी यांची भेट या दोन महत्त्वाच्या विषयावर केली चर्चा

0
242

मुंबई, 21 एप्रिल : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यातच पालघरमध्ये झालेल्या दोन साधूंच्या हत्या प्रकरणानंतर महाष्ट्रातील वातावरण तापलं होतं. या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. या भेटीत देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाचं संकट आणि पालघर हत्याकांड या दोन्ही विषयांवर राज्यपालांशी चर्चा केली असल्याची माहिती आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या राज्यपालांच्या भेटीत उद्धव ठाकरे यांच्या नेमणुकीविषयी काही चर्चा झाली का, याचीही राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. कारण काही दिवसांपूर्वीच भाजपचे सहयोगी माजी खासदार संजय काकडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली होती की आपण उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीच्या नेमणुकीविषयी सामंजस्याची भूमिका घ्यावी.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून पालघरमध्ये दोन साधूंच्या झालेल्या हत्या प्रकरणानंतर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या भेटीमध्ये उद्धव ठाकरेंच्या विधानपरिषदेच्या नेमणुकीबाबत देखील चर्चा झाली असल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

तत्पूर्वी, राज्य मंत्रिमंडळाने उद्धव ठाकरे यांना नियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषदेवर पाठविण्याची शिफारस केली होती. आता कॅबिनेटने मंजुरी दिलेली असतानाही आमदारकीच्या प्रस्तावावर राज्यपालांनी अजूनही आपल्या संमतीची मोहोर उठवलेली नाही. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील अप्रत्यक्षपणे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला होता. ‘राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है,’ असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं होतं.

विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचा सदस्य नसलेल्या कोणत्याही मंत्र्याला पदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत विधानसभा अथवा विधानपरिषद यापैकी एका सभागृहात निवडून येणं बंधनकारक आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपश घेतली आहे. त्यामुळे त्यांची मुदत येत्या 27 मे रोजी संपुष्टात येणार आहे. एप्रिलमध्येच यंदाच्या विधानपरिषद निवडणुका पार पडणार होत्या. पण मार्चमध्ये राज्यात कोरोनाचे संकट आल्यानं या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपालांनी आमदार करावे, अशी शिफारस काही दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना करण्यात आली आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur