मुंबई : परप्रांतीय मजुर राज्याबाहेर गेले त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, महाराष्ट्रातील तरुणांमध्ये ते स्कील नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणत असतील तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्कील इंडिया कार्यक्रम बिनकामाचा ठरला का ? असा सवाल करतानाच देवेंद्र फडणवीस यांनी मराठी तरुणांचे मानसिक खच्चीकरण केले आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

देवेंद्र फडणवीस कितीही तरुणांवर अविश्वास दाखवू देत आमचा आपल्या महाराष्ट्रातील तरुणांवर विश्वास असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.महाराष्ट्र विकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आज मुंबईत झाली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि शिवसेनेचे नेते परिवहन मंत्री अनिल परब यांनी संबोधित केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर देत तिन्ही मंत्र्यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार पलटवार करत समाचार घेतला.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील आणि विशेषतः मुंबईतील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली असल्याच्या बातम्या काही जणांकडून जाणीवपूर्वक पसरवण्यात आल्या. खरंतर देशामध्ये कोरोनासंदर्भात सगळ्यात चांगलं काम महाराष्ट्रात सुरू आहे.

मे महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोनाचा महाराष्ट्रातील आकडा बराच वाढलेला असेल असा अंदाज केंद्रसरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवला होता. मात्र राज्य सरकारने वेळीच उपाययोजना केल्या म्हणून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली नाही अशी माहितीही पाटील यांनी यावेळी दिली.
विरोधी पक्षनेते फडणवीस हे कोवीड योध्दांना भक्कम पाठिंबा देतील असं वाटलं होतं. पण ते वेळोवेळी कोरोनाशी लढा देणाऱ्यांचा अपमान करत आहेत. उलट महाराष्ट्र बचाओ आंदोलन करून कोवीड योध्दांच्या मेहनतीवर पाणी फिरवण्याचे काम भाजपने केल्याचा आरोपही पाटील यांनी केला. भाजपने परप्रांतीय मजूरांना घरी नेले असेही फडणवीस म्हणाले, मात्र या सर्वांच्या प्रवासासाठीचे पैसे मुख्यमंत्री सहायता निधीतून दिले गेले.
भाजपने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक पैसा दिला नाही. राज्याला पैसा न देता केंद्राला निधी देणारा भाजप महाराष्ट्राचा शत्रू आहे का असा आता प्रश्न पडलाय असा टोला पाटील यांनी लगावला.कोवीड विरोधात आपण लढत असतानाच मुंबई, बीकेसी येथील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र केंद्रसरकारने गुजरातला हलवण्याचे काम केले याचे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला दुःख आहे असेही पाटील म्हणाले. फडणवीस यांनी २८ हजार कोटी रुपये केंद्राने महाराष्ट्राला दिल्याचे सांगितले परंतु प्रत्यक्षात आतापर्यंत फक्त ६६४९ कोटी रुपये मिळाले आहेत असे असताना २ लाख ७१ हजार कोटी राज्याला मिळणार असल्याचेही फडणवीस म्हणतात ते मिळाले तर मी त्यांचे आताच आभार मानतो असा टोलाही पाटील यांनी लगावला.

अनिल परब –
देवेंद्र फडणवीस यांच्या आभासी पत्रकार परिषदेला प्रत्यक्ष उत्तर देत आहोत
विरोधीपक्षाने उणीदुणी काढण्यापेक्षा केंद्राकडून मदत आणून दिली असती, तर आम्ही अभिनंदन केलं असतं
1750 कोटी रुपयांचा गहू महाराष्ट्राला मिळालेला नाही, 122 कोटी स्थलांतरित मजुरांसाठी दिलेले नाही

महाराष्ट्रातून 600 श्रमिक ट्रेन सुटल्या, या सर्व ट्रेनचा खर्च महाराष्ट्र सरकारने दिले आहे, कोणत्याही श्रमिकाकडून पैसे घेतलेले नाही
एका ट्रेनला 50 लाख खर्च कुठून येतो याचा हिशोब विरोधीपक्षाकडून घ्या
महाराष्ट्रापेक्षा लहान गुजरात राज्याला जास्त ट्रेन, राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र सरकारचे हक्काचे 18 हजार कोटी आम्हाला मिळालेले नाही
कायद्यात नसलेले देऊ नका, जे कायद्यात बसतात ते पैसे तरी द्या
9 हजार कोटी कापूस, धान, चणा-मका अशा शेतमाल खरेदीसाठी दिल्याचा दावा खोटा
मजुरांच्या छावण्यांसाठी 1611 कोटी दिल्याचे सांगितले, दरवर्षी 4600 कोटी आपत्ती व्यवस्थापनाचे मिळतात, हे त्यातलेच पैसे, वेगळे दिलेले नाही
जयंत पाटील –
राज्य सरकार सध्या कोरोना या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे
ही सरकार पाडण्याची नाही, सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ, जयंत पाटील यांचा भाजपला टोला
देशात सर्वाधिक चांगल्या पद्धतीने मुंबईत परिस्थिती हाताळली गेली आहे.
WHO ने एप्रिल अखेर मुंबईत लाखांच्यावर रुग्ण असतील असे सांगितले, मात्र रुग्ण संख्या नियंत्रणात
भाजप महाराष्ट्राचा मित्र आहे की शत्रू? फडणवीस यांचे हे वागणे आम्ही विसरणार नाही
कोरोना संकटात गुजरातपेक्षा महाराष्ट्रची स्थिती चांगली
भाजप सध्याच्या वागण्यामुळे जनतेच्या मनातून कायमची उतरली
बाळासाहेब थोरात –
राज्यात कोरोनाच्या संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात एकत्रित काम सुरू
जे पायी जात होते त्यांचीही काळजी घेतली गेली, बसेसने त्यांची सोय केली. कार्यकर्तेही मदत करत आहेत
विरोधीपक्ष सहकार्य करण्याऐवजी वेगळी मोहीम उघडून गोंधळ निर्माण करत आहे
आम्ही या कोरोनाचा सामना नक्की करु आणि महाराष्ट्राला कोरोनातून बाहेर काढू