ग्लोबल न्यूज : राज्यातील जनतेला कोरोना व्हायरसपासून वाचविणारच, त्यासाठी कोणत्याही थराला जाईल. परंतु, कोरोनाप्रमाणे आणखी एक व्हायरस समजात दुही पसरविण्याचा प्रयत्न करतोय, त्याला सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ( शनिवारी ) दिला.

गुढीपाढवा, रामनवमी हे सण घरी साजरी करण्यात आली. त्यामुळे अन्य धर्मियांनीही आपले सण, उत्सवही आपापल्या घरीच साजरे करावेत. कारण पुढील सूचना येईपर्यंत राज्यात कोणताही राजकीय, धार्मिक, क्रीडा महोत्सव होणार नाही. अशा कोणत्याही महोत्सवाला परवानगी दिली जाणार नाही, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज ( शनिवारी ) राज्यातील जनतेशी फेसबुकद्वारे संवाद साधला. जनतेने बाजारात गर्दी करू नये. सोशल डिस्टंसिन्गचे प्रत्येकाने पालन करावे. सध्या संयम पाळण्याची गरज आहे. यातूनच आपण या संकटातून बाहेरू पडू शकतो. मात्र, समाजात दुही पसरविणारे व्हिडिओ कुणी व्हायरल केले तर त्यांना सोडणार नाही. कायद्याच्या कचाट्यातून त्यांना कुणीही वाचवू शकणार नाही,असा इशाराही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला.
दिल्लीतून आलेल्या तबलिगी जमातीच्या नागरिकांची यादी केंद्राकडून मिळाली आहे. त्यानुसार त्यांचा शोध घेऊन त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. अन्य कोणी दिल्लीतून आले असेल तर त्यांनीही पुढे येऊन आरोग्य यंत्रणेकडून तपासणी करून घ्यावी. त्याचबरोबर नागरिकांनीही आपल्या आजूबाजूला कुणी अश्या व्यक्ती असतील तर त्यांची माहिती सरकारला कळवावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.