दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; कोरोनामुळे शेवटचा पेपर लांबणीवर
मुंबई – कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 52 वरून 63 वर गेली असून, मुंबई 10 नवीन रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
याच पार्श्वभूमीवर कोरोनामुळे दहावीचा एक पेपर लांबणीवर टाकण्यात आला आहे. कोरोना व्हायरस प्रादुर्भाव वाढत असल्याने अखेर दहावीच्या एका विषयाचा पेपर आता पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी (21 मार्च) दहावीच्या एका विषयाचा पेपर पुढे ढकलला असल्याची माहिती दिली आहे. दहावीचा 23 मार्च रोजी होणारा पेपरही रद्द करण्यात आला आहे. सोमवारी होणारा पेपर आता 31 मार्चनंतर होणार म्हणजेच 31 मार्चनंतर पेपरची तारीख जाहीर होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
शुक्रवारी राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला होता. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता दहावीच्या एका विषयाचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे.