लखनौ: उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील एका मंदिरात दोन साधूंच्या हत्या प्रकरणाला आता राजकीय रंग चढत असल्याचे दिसून येत आहे. या घटनेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन करुन घटनेबद्दल चिंता व्यक्त केली होती. मात्र, यावेळी योगी आदित्यानाथ यांनी ट्विटरवरुन शिवसेनेला लक्ष्य करत महाराष्ट्र सांभाळा यूपीची काळजी करु नका’ असं थेट सुनावलं आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी योगींना अशा वेळी फोन केला जेव्हा काही दिवसांपूर्वी पालघर हिंसाचारावर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करुन चिंता व्यक्त केली आणि दोषींना शिक्षा करण्याची मागणी केली.

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील मंगळवारी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली होती. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन केला आणि मंदिरात साधूंच्या हत्येबद्दल चिंता व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की ही अमानवीय घटना आहे आणि अशा घटनांना सामोरे जाण्यासाठी आपल्याला एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, पीडितांना न्याय मिळला पाहिजे’

त्याचबरोबर आता यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ऑफिसकडून ट्वीट करण्यात आलं आहे. पालघर घटनेवर योगी आदित्यनाथ यांनी उद्धव ठाकरे यांना केलेल्या कॉलबाबत अशी माहिती दिली की, उद्धव ठाकरे यांना यासाठी फोन करण्यात आला होता कारण की, पालघरमध्ये जीव गमावलेले साधू हे निर्मोही आखाडाशी संबंधित होते.
यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाकडून संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. तसंच त्यांनी असाही सवाल उपस्थित केला आहे की, नेमकं राजकारण कोण करतंय?


बुलंदशहर घटनेवर केलेल्या कारवाईबाबत असे सांगण्यात आले की, यूपीमध्ये कायद्याचे राज्य आहे आणि कायदा मोडणाऱ्यांवर येथे काटेकोरपणे कारवाई केली जाते. ‘आपण महाराष्ट्र सांभाळा, यूपीची चिंता करु नका.’
उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील एका मंदिरात दोन साधूंचे काल (मंगळवार) मृतदेह सापडले होते. दोन्ही साधूंना धारदार शस्त्राने मारण्यात आलं होतं. दरम्यान, येथील स्थानिकांनी आरोपीला पकडून तात्काळ पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं. अनुपशहर पोलिस स्टेशन परिसरातील पागोना या गावात असलेल्या शिव मंदिरात ही घटना घडली होती.
बुलंदशहरमध्ये दोन साधूंची हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा हे साधू मंदिरात झोपले असताना एका गर्दुल्ल्याने त्यांच्यावर हल्ला केला. दरम्यान, २ दिवसांपूर्वीच या साधूंसोबत आरोपीचा वाद झाला होता. याच रागातून त्याने साधूंची हत्या केली. येथील स्थानिकांनी अशीही माहिती दिली आहे की, आरोपी हा काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून सुटून जामिनावर बाहेर आला होता. तो दरोडा आणि खुनाच्या आरोपाखाली गेले काही दिवस अटकेत होता.
पालघरमध्ये तीन लोकांचा मारहाणीत झाला होता मृत्यू
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील पालघरमध्ये दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरला जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता. हे चोर असल्याच्या संशयातून गावकऱ्यांनी केलेल्या मारहाणीत तिघांचा बळी गेला होता. याप्रकरणी राज्य सरकारवर बरीच टीका देखील झाली होती. योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन याविषयी आपली नाराजी देखील बोलून दाखवली होती.