मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने दक्षता घेतली नसती तर महानगर मुंबई आणि अख्खा महाराष्ट्र कोरोनाच्या महाभयंकर साथीने वेढला असता, अशी माहिती आता समोर आली आहे.दिल्ली येथे झालेल्या या कार्यक्रमाल ‘तबलीगी जमात’ च्या ‘मरकज’ या कार्यक्रमासाठी मुंबई जवळील वसई येथे परवानगी देण्यात आली होती. जानेवारीमध्ये पालघरच्या पोलीस अधीक्षकांनी या कार्यक्रमाला परवानगीही दिली होती.

मात्र कोकणचे आयजी निकेत कौशिक यांनी कोरोनाचा वाढता प्रसार पाहता पालघर पोलिस अधीक्षकांसोबत बैठक घेतली. या तबलीगी जमातच्या कार्यक्रमाला किती लोक येणार आहेत, याचा आढावा या बैठकीत घेतला. यावेळी हजारोंच्या संख्येने देशभरातून या समाजाचे लोक उपस्थित राहणार असून परदेशातील अनेक राष्ट्रांमधून शेकडो लोक येणार असल्याची माहिती समोर आली. या माहितीमुळे गृहविभाग हवालदिल झाला.

गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत संबंधित कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यात आली. दरम्यान, देशभरात कोरोनाचे रूग्ण आढळत असल्याने या कार्यक्रमावर बंदी घालण्याचा तडकाफडकी निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार जानेवारीमध्ये दिलेली परवानगी पोलिसांनी ६ मार्च रोजी रद्द केली.
हा कार्यक्रम १४ मार्चला वसईत होणार होता. पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मरकज कार्यक्रम रद्द झाला आणि महानगर मुंबईसह अख्या महाराष्ट्रावरील कोरोनाचे महा भयानक संकट टळल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्र सरकारने परवानगी नाकारल्यानंतर तबलीगी समाजाचा कार्यक्रम दिल्ली येथे घेण्यात आला. हा कार्यक्रम दिल्लीत झाल्याने दोन हजारांच्या आसपास जमातीचे लोक तिथे पोहोचले. पण हा कार्यक्रम वसईत झाला असता तर किमान आठ ते दहा हजार लोकांनी त्या कार्यक्रमाला हजेरी लावली असती, अशी माहिती ती उघड झाली आहे.
एवढ्या मोठ्या संख्येने वसईतील कार्यक्रमाला लोक हजर झाले असते तर महाराष्ट्रात आणि मुंबईत कोरोनाचा महाभयानक प्रसार झाला असता अशी भीती व्यक्त केली जात आहे.
राज्य सरकारच्या दक्षतेमुळे ‘मरकज’ चा कार्यक्रम महाराष्ट्रातून दिल्लीकडे गेल्याने संपूर्ण पोलीस प्रशासनाचे सरकारच्या यंत्रणेमार्फत कौतुक केले जात आहे. महाराष्ट्र सरकारने परवानगी नाकारल्या नंतरही दिल्ली पोलिस व दिल्ली सरकार गाफील राहिल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.