तबलिग जमातच्या रुग्णांनी गाझियाबाद येथील महिला आरोग्य कर्मचाऱ्यांसमोर अश्लील कृत्य केल्याचे प्रकरणी योगी सरकारने गांभीर्याने घेतले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याविरोधात अत्यंत कडक निर्णय घेतला असून जमातच्या सर्व रुग्णांविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार (रासुका) कारवाई केली जाणार आहे. या रुग्णालयात आता केवळ पुरुष कर्मचाऱ्यांनाच तैनात केले जाणार आहे.

शुक्रवारी सकाली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बैठक घेतली. यादरम्यान त्यांनी गाझियाबाद प्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. ते म्हणाले की, नर्सबरोबर अश्लील कृत्य करणाऱ्या जमातीच्या लोकांविरोधात कडक कारवाई करा. त्यांना कायद्याचे पालन करण्यास शिकवा. ते मानवतेचे शत्रू आहेत. त्यांनी जे केले तो गंभीर गुन्हा आहे. त्यांच्यावर रासुका लावा. आम्ही त्यांना सोडणार नाही

इंदूरसारखी घटना उत्तर प्रदेशात दिसली नाही पाहिजे. त्यासाठी आवश्यक ती कडक कायदेशीर कारवाई व्हायला हवी, असेही त्यांनी यावेळी निक्षून सांगितले. क्वारंटाइन असलेले लोक पळून गेले तर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक जबाबदार असतील. अत्यावश्यक साहित्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांना संपूर्ण सूट असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, जमातीतील हे लोक वॉर्डमध्ये अश्लील गाणे म्हणत आहेत. विवस्त्र फिरत आहेत. महिला कर्मचाऱ्यांकडे विडी-सिगारेटची मागणी करत आहेत. अशा परिस्थितीत या रुग्णांवर उपचार करता येणे शक्य नसल्याची तक्रार या रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांनी केली होती.