लडाखमध्ये चीनला भारताने ‘करारा जवाब’ दिला आहे-मोदी
डोळे वटारुन बघाल तर डोळे काढून घेऊ
लडाखमध्ये चीनला भारताने करारा जवाब दिला आहे असं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात म्हटलं आहे.


आपल्या देशाकडे डोळे वटारुन पाहणाऱ्यांना भारताने धडा शिकवला आहे. भारतमातेकडे डोळे वर करुन पाहाल तर तुमचे डोळे काढून घेण्याची ताकद आमच्यात आहे हे भारतीय जवानांनी दाखवून दिलं आहे. जे जवान शहीद झाले आहेत त्याबद्दल संपूर्ण देशाला अतीव दुःख आहे. मात्र ज्या कुटुंबातले जवान शहीद झाले त्यांनीही घरातल्या दुसऱ्या मुलांना सैन्यातच भरती करणार असं म्हटलं आहे. शहीदांच्या कुटुंबांबद्दल देशाला अभिमान आणि गर्व आहे असंही मोदींनी म्हटलं आहे.
करोनाचं संकट वाढतं आहे, त्यावर आपण अनेकदा बोललो आहोत. अनेकांना वाटतंय की हे वर्ष कधी संपेल. कुणी म्हणतंय की हे वर्ष शुभ नाही. लोकांना वाटतंय की हे वर्ष लवकर संपावं. अशा चर्चा का होत आहेत याचा विचार करतो तेव्हा मला हेच वाटतं की करोनाचं संकट हेच यामागचं कारण आहे.
करोनाचं संकट येणार हे आपल्याला सहा-सात महिन्यांपूर्वी कुठे ठाऊक होतं? असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये म्हटलं आहे. अम्फान, निसर्ग यासारखी चक्रीवादळं येऊन गेली. शेजारी देश कुरापती काढतो आहे. तरीही आपण सगळ्या संकटांना तोंड देतो आहे. हे वर्ष अशुभ नाही हे लक्षात घ्या. एका वर्षात एक आव्हान येओ किंवा ५० आव्हानं येवोत डगमगून जायचं नाही हे भारताचं वैशिष्ट्य आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून भारताने कमी संकटांचा सामना केला आहे. एका वर्षात अनेक संकटांचा सामना आपण केला आहे. मात्र डगमगून जाण्याची गरज नाही. आपण संकटांचा सामना करतो आहोत असंही मोदींनी म्हटलं आहे. अनेक संकटांचा सामना करत आपल्याला पुढे जायचं आहे. या वर्षातच आपल्याला नवी स्वप्नं पाहायची आहेत हे कुणीही विसरु नये. मला १३० कोटी भारतीयांवर पूर्ण विश्वास आहे असंही मोदींनी म्हटलं आहे. संकट कितीही मोठं असलं तरीही भारताचे संस्कार हे निस्वार्थ भावनेने सेवेची प्रेरणात देतात हे अत्यंत महत्त्वाचं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.