अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला निर्वाणीचा इशारा दिलाय. कोरोनाच्या प्रसारासाठी चीन जबाबदार असेल तर त्याचे गंभीर परिणाम चीनला भोगावे लागतील, असा धमकीवजा इशाराच ट्रम्प यांनी दिलाय. चीननं जाणीवपूर्वकच साऱ्या जगभर कोरोनाचा प्रसार केल्याचा अप्रत्यक्ष आरोप यापूर्वीही ट्रम्प यांनी केलाय.

मृतांच्या संख्येत चीनच पहिला : ट्रम्प
कोरोनाबळींच्या आणि रुग्णांच्या संख्येबाबत चीनने जाहीर केलेली आकडेवारी अवास्तव असून जगातील सर्वाधिक मृत्यू चीनमध्येच झाले असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केला. चीनने दोनच दिवसांपूर्वी वुहानमधील मृतांच्या संख्येत १३०० मृत्यूंची अधिकृतरित्या वाढ केली. या मृत्यूंची नोंद आधी झालीच नव्हती, असे त्यांनी सांगितले. यावरून चीन सरकारच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यावरूनच ट्रम्प यांनी आज त्यांच्यावर टीका केली.


‘कोरोनाबळींच्या संख्येत आम्ही पहिल्या क्रमांकावर नाहीत. चीन पहिला आहे. ते सांगत असलेल्या संख्येपेक्षा कितीतरी अधिक जणांचा मृत्यू त्यांच्याकडे झाला आहे. अत्यंत प्रगत आरोग्य यंत्रणा असलेल्या युरोपीय देशांमध्येही मृतांचे प्रमाण अधिक असताना चीनमध्ये रुग्णांच्या तुलनेत मृतांचे प्रमाण केवळ ०.३३ टक्के असावे, हे अवास्तव आहे,’ असा दावा ट्रम्प यांनी आज केला.
मुस्लिमांनीही नियम पाळावेत
ईस्टर संडेच्या काळात ख्रिस्ती धर्मियांनी ज्याप्रमाणे सामाजिक अंतर आणि मास्कचे नियम पाळले, त्याचप्रमाणे रमजानच्या काळातही मुस्लिम धर्मियांनी हे नियम पाळावेत, अशी अपेक्षा डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली. इस्टरच्या काळात नियमभंग केल्याबद्दल काही ख्रिस्ती नागरिकांवर कडक कारवाई झाली होती. अशीच कारवाई मुलिस्मांवरही होणार का, असा प्रश्न विरोधकांनी विचारल्यानंतर ट्रम्प यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
वुहानच्या एका प्रयोगशाळेतून कोरोनाचा मुद्दाम प्रसार केला गेला, असा आरोप अमेरिकेतील एका वृत्तवाहिनीनं केला. दुसरीकडे कोरोना प्रसारासाठी डोनाल्ड ट्रम्प हे सुरुवातीपासूनच चीनला जबाबदार धरत आहेत. आता ट्रम्प यांनी चीनला निर्वाणीचा इशारा दिलाय. त्यामुळे या दोन्ही देशांमधील संबंध आणखी ताणले गेलेत.