आपल्या वक्तव्याचा, घोषणांचा देशाची सुरक्षा आणि देशहितांवर काय परिणाम होतो याचा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावध राहिले पाहिजे. मोदीजी, शब्दांचा वापर जपून करा, असा महत्त्वपूर्ण सल्ला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिला आहे. आपल्या वक्तव्याचा वापर चीन करून घेणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

गेल्या आठवडय़ात प्रमुख पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुस्थानी हद्दीत कोणीही घुसखोरी केलेली नाही किंवा लष्करी चौकीही ताब्यात घेतलेली नाही असे वक्तव्य केले होते. यावर टीका झाल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने खुलासा केला असला तरी, गलवान खोऱयात आपले 20 जवान शहीद कसे आणि कोणत्या ठिकाणी झाले? असे अनेक प्रश्न उपस्थितीत होत आहेत. विरोधकांकडून विशेषताः काँग्रेसने अनेक प्रश्न उपस्थितीत करून मोदी सरकारने देशापुढे सत्य मांडावे अशी मागणी केली आहे.
असत्य प्रचाराने सत्य दाबले जाऊ शकणार नाही

भ्रामक प्रचार हा कोणत्याही रणनीतीचा आणि मजबूत नेतृत्वाचा पर्याय असू शकत नाही. मागे-पुढे करणाऱया सहकाऱयांकडून केल्या जाणाऱया असत्य प्रचाराने सत्य कधीही दाबले जाऊ शकणार नाही, असे डॉ. मनमोहन सिंग यांनी सुनावले.
लोकशाहीत जबाबदारी पंतप्रधानांवर आहे
देशाचे नेतृत्व करणाऱयांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. लोकशाहीत ही जबाबदारी पंतप्रधानांवर आहे, असे डॉ. मनमोहन सिंग यांनी सांगितले.