लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर येथील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जाणारा यंदाचा ३५ वा ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक व ज्येष्ठ नेत्र शल्यचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांना जाहीर करण्यात आला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज या पुरस्काराची घोषणा केली.

दरम्यान कोरोनाची परिस्थिती अवाक्यात आल्यास जाहीर कार्यक्रमातुन या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. अन्यथा समितीच्या वतीने डॉ.लहाने यांना त्यांच्या राहत्या घरी जाऊन हा पुरस्कार देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे दरवर्षी राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त समाजप्रबोधन, साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती, विज्ञान, संगीत आदी क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीस वा संस्थेस हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. रोख एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आतापर्यंत भाई माधवराव बागल, चित्रतपस्वी व्ही.शांताराम,डॉ.बाबा आढाव, डॉ.एन.डी.पाटील, उत्तर प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री मायावती, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, जेष्ठ नेते शरद पवार, हिंदकेसरी गणपतराव आंदळकर आदी विविध क्षेत्रातील ३४ जणांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

यंदा सन २०२० साठी देण्यात येणारा हा पुरस्कार
डॉ.तात्याराव लहाने यांच्या वैद्यकीय कार्याची दखल घेवून जाहीर झाला आहे. बिनटाक्याच्या नेत्र शस्त्रक्रियांसाठी ते प्रसिध्द असून सामाजिक बांधिलकीतुन त्यांनी एक लाख साठ हजाराहून अधिक शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. यापुर्वी त्यांना सन २००८ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.