डीसीसी बँकेच्या कर्मचार्यांनी राजकारणाच्या फंदात न पडता आपली बँक समजून काम करावे -आ. राजेंद्र राऊत
बार्शी: गणेश भोळे
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकर्यांची बँक असून या पुढील काळात बँकेची आर्थिकस्थिती भक्कम व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे. कर्मचार्यांनीही बँक आपल्या स्वतःची आहे, असे समजून राजकारण्यांच्या फंदात न पडता प्रामाणिकपणे बँकेसाठी काम करावे, असे आवाहन आमदार राजेंद्र राऊत यांनी केले.

ते सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मार्केट यार्ड शाखेत आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बँकेचे शाखाधिकारी शिवलिंग गाडवे, बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे, नगरसेवक प्रशांत कथले, बाबा मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

राजेंद्र राऊत पुढे म्हणाले की, जे लोक चांगले काम करतात त्यांचे कौतुक करण्यास आम्ही मागे पुढे पहात नाही. मात्र ज्यांनी बँक अडचणीत आणली त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणे हे माझे काम आहे आणि ते मी करत राहणार. लवकरच बँकेचे प्रशासक शैलेश कोथमिरे यांची भेट घेवून बाजारातील व्यापार्यांना त्यांच्या उलाढालीनुसार 20 ते 50 लाख रुपयांचे कॅश क्रेडीट कर्ज द्यावी अशी मागणी करणार आहे. एखाद्या खातेदाराला मोठे कर्ज देण्यापेक्षा व्यापार्यांना मदत केल्यास व्यापरही वाढेल व बाजारपेठही सक्षम होईल, असेही ते म्हणाले.

यावेळी बँकेच्यावतीने कर्मचार्यांनी त्यांचा सत्कार केला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे या बँकेतील चालू खाते बंद होते. ते पूर्ववत चालू करण्यात आले. तसेच बाजार समितीची 5 लाख रुपयांची ठेवही या शाखेत ठेवण्यात आली. या पुढील काळात बँकेच्या ठेवी वाढविण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
परिस्थिती बदलली
आजवर बँक वाचविण्यासाठी आ. राजेंद्र राऊत यांनी गेल्या 10 वर्षांपासून बँकेच्या विरोधात उच्च न्यायालयापर्यंत लढाई दिली. ती अद्याप सुरुच आहे. ज्या बँकेत आमदार राऊत यांना पूर्वी आमदार असतानाही कधी बोलाविले नाही. त्याच बँकेत आता परिस्थिती बदलल्याने सन्मानाने बोलवून त्यांचा मान सन्मान केला.