भोर : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर संपूर्ण जग ठप्प झाले आहे. पूर्ण देश व महाराष्ट्र राज्य बंद आहे. त्यामुळे हातावर पोट असणा-यांना रोजगाराअभावी उपास पडू नये यासाठी ठाकरे सरकारने सर्व, गाव, तालुका, जिल्हा पातळीवर आपले लक्ष केंद्रित केले असून कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली आहे.

भोर तालुक्यातील अतिदुर्गम डोंगरी भागातील मौजे बोपे, कुंबळे, चांदवणे, वेळवंड, डेहेण, कोंडगांव, सांगवी (वे.खो.), इत्यादी गांवचे 146 गरीबांना शासनाने मदत पुरवली आहे.
भोर तालुका महसूल विभाग आणि पंचायत समितीच्या ग्रामसेवक संघातर्फे भोरचे उप विभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार अजित पाटील व गटविकास अधिकारी विशाल तनपुरे व ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जगताप यांनी पुढाकार घेऊन गावक-यांना ही मदत पुरवली आहे.


तालुक्यातील 1 हजार गरजूंना 18 जीवनावश्यक साहित्याचे किटस वाटप करण्याचा शासनाचा संकल्प आहे. आजअखेर 900 पेक्षा जास्त गरजूंना मदत पोहचवण्यात आली आहे. हे काम सुरूच राहणार असल्याचे उपविभागीय अधिकारी जाधव यांनी सांगितले.
आंबाडे खोऱ्यातील कोळीवाडी, रायरेश्वर गडावरील जंगम वस्ती, हिर्डोशी खोऱ्यातील धानवलीपासून शिरवली, दुर्गाडी, अभिपुरी, उंबार्डेवाडी, राजापूर, शिळींब आदी भागातही मदत पोहचवल्याचे तहसीलदार अजित पाटील व गटविकास अधिकारी तनपुरे यांनी सांगितले.