मुंबई : कोरोना व्हायरसचं जागतिक संकट महाराष्ट्राला धडक देत आहे. हा व्हायरस महाराष्ट्रात वेगानं पसरल्यास राज्यात मोठी किंमत चुकवावी लागेल. याच गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्य सरकार कोरोनाला रोखण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काही वर्षांपूर्वी हृदयाची शस्त्रक्रिया झालेली आहे. त्यामुळे अशा व्यक्तिंना ताण-तणावापासून दूर राह्यला सांगितलं जातं. मात्र आज राज्यात युद्धाची परिस्थिती असताना उद्धव ठाकरे एखाद्या सेनापतीप्रमाणे धीरोदत्तपणे लढत आहेत. महाराष्ट्राला धीर देत आहेत, अशा शब्दांत राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं.
‘महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या माहितीसाठी…मुख्यमंत्री मा.श्री.उद्धव ठाकरे यांची काही वर्षांपूर्वी हृदय शस्त्रक्रिया झाली आहे. ती कशा प्रकारची होती हे मी इथे सांगू इच्छित नाही. पण, अशा व्यक्तीने ताण-तणावापासून लांब रहावे असे सांगितले जाते. आपण सगळ्यांनी त्यांचे कौतुक करायला पाहिजे. आज युद्धाची परिस्थिती असताना हे युद्ध मागून न-लढता एका धीरदस्त सेनापती प्रमाणे ते समोरून लढत आहेत आणि महाराष्ट्राला धीर देत आहेत.धन्य आहे… आणि अभिमान पण आहे. #आभारउद्धवठाकरे,’ अशी फेसबुक पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी लिहिली आहे.

राज्यात करोनाचे रुग्ण आढळल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: जातीने लक्ष देऊन परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला आहे. करोनाचा फैलाव होऊ नये म्हणून त्यांनी वेळीच तातडीने उपाययोजना केल्या आहेत. शिवाय अधिकाऱ्यांशी बैठका घेऊन परिस्थितीचा आढावा घेणं, केंद्रापासून ग्रामपंचायती स्तरापर्यंतच्या अधिकारी-कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींशी संपर्क ठेवून त्यांनी उत्तम प्रकारे परिस्थिती हाताळली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या कामाची धडाडी पाहूनच आव्हाड यांनी त्यांचं कौतुक केलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी फेसबुकद्वारे साधला संवाद, काय आहेत ठळक मुद्दे:
- सर्वत्र एकच खबरदारीचा उपाय सांगितला जात आहे म्हणजे घरातच राहा. मी काल या लढ्याला युद्धाची उपमा दिली आहे.
- जगण्यासाठी आपल्याला घरात थांबण्याची वेळ आली आहे.
- अनेकांनी मदतीला सुरुवात केली आहे. दिग्गजांनी आपले काम थांबवून यामध्ये आम्हाला मदत केली आहे. चित्रपटसृष्टीतले, क्रीडा क्षेत्रातले सर्वच पुढे आले आहेत.
काल मी आवाहन केले होते, त्याला प्रतिसाद मिळतोय . पुढचे 15-20 दिवस अत्यंत -महत्वाचे आहे. संसर्ग टाळणे महत्वाचे आहे - काही गोष्टी आपल्या काळजीसाठी घेत आहोत. आपले सहकार्य असू द्या.
- अनेकांनी सल्ले दिले आहेत की बसेस, रेल्वे बंद करा पण अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांची ने आण कशी करणार ? मनपा कर्मचारी, वाहनचालक काय करणार
- तूर्त या सेवा बंद न करता सरकारी कार्यालयांत 25 टक्के कर्मचारीच कामावर बोलावणार. यापूर्वी ५० टक्के कर्मचाऱ्यांचा निर्णय घेतला होता. बँका सुरूच राहतील.
- खास करून मुंबई, पुणे-पिंपरी चिंचवड, नागपूर या मोठ्या शहरांत सर्व कार्यालये, दुकाने बंद होतील. यातून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली आहे. यात अन्नधान्य, दुध, औषधी यांचा समावेश आहे.
- या शहरांमध्ये कुणाला काही संभ्रम असेल तर संबंधित जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्याशी बोलू शकतात.
- ज्या आस्थापना, दुकाने बंद करतो आहात त्यांना माझे आवाहन आहे की आपला जो कष्टकरी कर्मचारी वर्ग आहे त्यांना किमान वेतन देणे बंद करू नका.