जनतेने नेमकं काय समजायचं? मुख्यमंत्र्यांच्या ट्वीटने चर्चांना उधाण
मुंबई: खरी शिवसेना कुणाची? यावरून शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटामध्ये सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई सुरू आहे. दुसरीकडे शिवसेना आमचीच असा दावा करणारे ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची? अशी जोरदार चर्चा पुन्हा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.


शिवसेनेत बंडखोरी करत एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झालेत. भाजपाचा पाठींबा घेत राज्यात शिवसेना-भाजपाचे युतीचे सरकार असल्याचा
दावा करत आपण म्हणजेच सर्व बंडखोर मुळ बाळासाहेबांचे शिवसैनिक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील सर्व आमदार
सातत्याने बोलत असतात.
मात्र, राज्यातील शिवसेना या प्रमुख पक्षातसध्या शिंदे गट आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा ठाकरे गट, असे दोन गट पडल्याचे स्पष्ट दिसत आहे. तसेच, शिवसेना नेमकी कुणाची, यासंदर्भातील अनेक बाबतीत न्यायालयात सुनावणी सुरु आहे, तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाकडेही हे प्रकरण आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ट्वीटची सध्या जोरात चर्चा होत असून, जनताही गोंधळात आहे.
काय आहे एकनाथ शिंदे यांचे ट्विट?
राज्यातील काही ग्रामपंचायतींचे निवडणूक निकाल शुक्रवारी जाहीर झाले. त्याबद्दल अभिनंदनची पोस्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पण
या पोस्ट मध्ये त्यांनी स्वत:च्या गटाला ‘शिवसेना’ संबोधले असून आणि मूळ शिवसेनेचा उल्लेख ‘उद्धव ठाकरे गट’ असा उल्लेख केला. या गोष्टीमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चर्चा आहे. तसेच, पुन्हा एकदा शिवसेना कुणाची हा संघर्ष तीव्र होणार, असे दिसत आहे.