जगदाळे मामा जयंती निमित्त बार्शीत
शिवशक्ती बँकेच्या वतीने ७ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान “कर्मवीर व्याख्यान माला”
बार्शी : श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कर्मवीर डॉ.जगदाळे मामा यांच्या जयंतीनिमित्त शिवशक्ती बँकेच्या वतीने दि ७ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान कर्मवीर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती बँकेचे चेअरमन डॉ. प्रकाश बुरगुटे यांनी दिली आहे
शुक्रवार दि ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता आमदार राजेंद्र राऊत यांच्या शुभहस्ते व्याख्यान मालेचे उद्घाटन होणार आहे यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी.वाय. यादव, नगराध्यक्ष असिफ भाई तांबोळी, सहाय्यक निबंधक अभय कटके आदी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी “विज्ञान आणि तंत्रज्ञान हवे की नको” या विषयावर नांदेड विद्यापीठाचे कुलगुरू पंडित विद्यासागर यांचे व्याख्यान होणार आहे तर शनिवार दि ८ रोजी”राज्यसंघटना आणि राष्ट्रवाद ” या विषयावर जेष्ठ विचारवंत डॉ विश्वभंर चौधरी, पुणे यांचे व्याख्यान होणार आहे यावेळी बँकेच्या संचालिका डॉ. मीरा यादव , सुनीता मगर उपस्थित राहणार आहेत. तर रविवार दि ९फेब्रुवारी रोजी ” संविधान एक जिवंत चारित्र्य” या विषयावर संविधान तज्ञ अॅड. असीम सरोदे, पुणे यांचे व्याख्यान होणार आहे.

यावेळी टेंभुर्णी चे प्राचार्य डॉ महेंद्र कदम, सोजर समूहाचे प्रमुख अरुणदादा बारबोले उपस्थित राहणार
आहेत. ही सर्व व्याख्याने शिवाजी महाविद्यालय परिसरातील संत तुकाराम हॉल येथे दररोज सायंकाळी साडेसहा वाजता वेळेवर सुरू होतील.
कर्मवीर जगदाळे मामांच्या प्रेरणेने सुरू असलेल्या बार्शीतील शिवशक्ती बँकेच्या वतीने मागील दहा वर्षांपासून केवळ श्रोत्यांच्या पाठबळावर सुरू असलेल्या कर्मवीर व्याख्यान मालेत आज पर्यंत माजी खासदार यशवंतराव गडाख,माजी आमदार उल्हास दादा पवार, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस ,जेष्ठ साहित्यिक स्व विद्या बाळ , डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ.अरुण अडसूळ, फादर फ्रान्सीस दिब्रिटो, प्रा. इंदुमती जोंधळे, जेष्ठ विचारवंत डॉ राजेंद्र दास,
जेष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, श्री. राजन गवस, क्राईम रिपोर्टर व मुक्त पत्रकारअश्विनी सातव आदी नामवंत वक्त्यांनी विचार मांडलेले आहेत.
या व्याख्यान मालेचा बार्शी करांनी लाभ घ्यावा असे आवाहन बँकेच्या वतीने चेअरमन डॉ प्रकाश बुरगुटे यांनी केले आहे.