जगभरात कोरोना विषाणूमुळे 1 लाख 19 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे संपूर्ण जग कोरोनाशी सामना करत असताना दुसरीकडे दोन शक्तिशाली देशांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. चीनने जागतिक आरोग्य संघटनेची फसवणूक करत चुकीची माहिती दिली आणि यामुळे कोरोनाचा जगभर प्रसार झाला असा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. तसेच चीनला याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार असल्याचे म्हणत त्यांनी थेट धमकी दिली आहे.

चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या विळख्यात जवळपास 180 देश आले आहेत. इटली, अमेरिका, फ्रांस, इराण, स्पेन, ब्रिटन या देशात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. अमेरिकेत सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. जगात आतापर्यंत 1 लाख 19 हजार लोकांचा यामुळे बळी गेला असून 20 लाख लोक संक8 झाले आहेत. याचे खापर ट्रम्प यांनी चीनवर फोडले आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि आंतरराष्ट्रीय समूहाला चीनने चुकीची माहिती दिली, असा आरोप ट्रम्प यांनी केला.

सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने चीनला याचे काय परिणाम भोगावे लागतील? याला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की, याबाबत मी तुम्हाला उघडपणे काहीही सांगणार नाही. परंतु चीनने याचे परिणाम भोगायला तयार राहावे, अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.

चीनवर हल्लाबोल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सुरुवातीपासून चीनवर निशाणा साधत आहेत. कोरोना विषाणूबाबत प्रारंभिक माहिती लपवल्याने हा विषाणू जगभर पोहोचला. याबाबत चीनने वेळीच माहिती दिली असती तर त्याला चीनमध्येच रोखता आले असते, असे ट्रम्प म्हणाले.