चिंता नको, तुम्ही माझ्या महाराष्ट्रात सुरक्षित आहात, मुख्यमंत्र्यांचा मजुरांना शब्द

0
273

मुंबई : कोरोनामुळे देशात 3 मेपर्यंत वाढलेला लॉकडाऊन आणि वांद्र्यात उसळलेल्या जीवघेण्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (CM Uddhav Thackeray lockdown 2) आज पुन्हा एकदा राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बाहेर राज्यातील नागरिकांना चिंता न करण्याचं आवाहन केलं. यावेळी त्यांनी मजुरांना तुम्ही माझ्या महाराष्ट्रात सुरक्षित आहात असा विश्वासही दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने भीम सैनिकांनी पाळलेल्या शिस्तीबद्दल उद्धव ठाकरे यांनी भीम सैनिकांचे विशेष धन्यवाद मानले. सोशल मीडियाच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी जनतेला संबोधित केलं.

उद्धव ठाकरे म्हणाले, “आज सकाळीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केलं. अर्थातच हे घरातल्या घरात केलं. अशा परिस्थितीत सर्व जातपात, धर्म आणि पंथांनी आपले उत्सव, सण हे आवरते घेतले आहे. बाबासाहेबांना वंदन करताना मला खास करुन भीमसैनिकांना धन्यवाद द्यायचे आहेत. कारण नेहमी 14 एप्रिल आणि डिसेंबरमध्ये एक भीमसागर शिवतीर्थावर उसळतो. अनेक गावातून, खेड्यापाड्यातून गोर गरिब, बाबासाहेबांचे भक्त आणि फक्त भक्तच नव्हे तर सर्वचजण तिथे येऊन महापुरुषाला अभिवादन करतात. कृतज्ञता व्यक्त करतात आणि शांतपणे आपल्या घरी परत जातात. पण आज मी भीमसैनिक आणि बाबासाहेबांच्या भक्तांना धन्यवाद एवढ्यासाठी देतो की, त्यांनीसुद्धा अत्यंत शिस्तीत किंबहुना शिस्त पाळत गर्दी न करता महापुरुषाला मानवंदना दिली. त्यांना सगळ्यांना मी धन्यवाद देतो.”

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बाबासाहेबांनी आपल्याला लढायला शिकवलं. त्या काळामध्ये बाबासाहेबांनी विषमतेविरोधात लढा दिला. आज संपूर्ण जग विषाणूविरोधात लढत आहे. संपूर्ण देशातील नागरिकांनी कोरोना विषाणूविरुद्ध अभूतपूर्व युद्ध पुकारलं आहे. ज सकाळीच मी बोलणार होतो. मात्र, पंतप्रधान मोदी बोलणार असल्यानं मी सायंकाळी बोलण्याचा निर्णय घेतला. अनेकांना वाटतं महाराष्ट्रात काहीतरी भीषण सुरु आहे. मात्र, असं काही नाही. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोना चाचणी झाल्या आहेत. त्यामुळे ही कोरोना रुग्णांची संख्या दिसते आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.

मी 6 महिन्याच्या बाळाला आणि 83 वर्षांच्या वयोवृद्धांना कोरोनाशी लढा देऊन बरं होताना पाहिलं आहे. त्यामुळे कोरोनातून बरं होता येतं हा विश्वास ठेवा. डॉ. ओक यांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ते कोरोना नियंत्रणासाठी काम करत आहेत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या निवदेनातील महत्त्वाचे मुद्दे:

कोरोनानंतर आणखी एक मोठं संकट येणार आहे हे संकट आर्थिक असेल.

आगामी काळात येणाऱ्या आर्थिक संकटाशी सामना करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात समिती करण्यात आली आहे.

शेतकरी आपला अन्नदाता, त्यांच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही.

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत राहिल.

20 एप्रिलनंतर कोणते उद्योग सुरु करता येतील यावर अजित पवार आणि त्यांची समिती निर्णय घेईल.

मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये अधिक काळजी घेतली जात आहे.

तुम्ही माझ्या महाराष्ट्रात सुरक्षित आहात, मजुरांना शब्द

गोरगरीब मजुरांच्या भावनांशी खेळू नका, त्याचं राजकारण करु नका

कुणीतरी गैरसमजाचं पिल्लू सोडल्यामुळे वांद्र्यातील गर्दी

तुम्ही परराज्यातून आले आहात, पण तुम्हाला लॉक करुन ठेवण्यात आम्हाला आनंद नाही, मात्र काळजी करु नका, तुम्ही महाराष्ट्रात सुरक्षित आहात

कोरोनानंतर आर्थिक संकटाच्या सामन्यासाठी समिती स्थापन

आरोग्य यंत्रणेसाठी टास्क फोर्स सज्ज

विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती

प्लाझ्मा ट्रिटमेंट आणि ईसीजी व्हॅक्सिनचे प्रयोग, यश आल्यास महाराष्ट्र जगाला दिशा देईल


उद्धव ठाकरे म्हणाले, “पंतप्रधानांनी देशाला उद्देशून संदेश दिला. त्या संदेशात त्यांनी 14 एप्रिलपर्यंतचा लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवला. मी पंतप्रधानांना धन्यवाद देतो. कारण दोन दिवसांपूर्वी आमची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे परिषद झाली तेव्हा मला सर्वात अगोदर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मला बोलण्याची संधी दिली होती. मी तेव्हा हा लॉकडाऊन काही काळ तरी वाढवला पाहिजे, असं मत मांडलं होतं. शनिवारीच मी राज्यात लॉकडाऊनची मुदत 30 एप्रिलपर्यंत केली होती. पंतप्रधानांनी ती 3 मे पर्यंत केली आहे.”

काही परिस्थिती आपल्या नियंत्रणात आली आहे काही नाही. मात्र, हा लढा आपण गांभिर्याने घ्यायला हवा. संपूर्ण देशातील माता, भगिनी आणि बांधवांनी अपूर्व असा लढा या विषाणूविरोधात सुरु केला. जिद्द, हिंमत आणि धैर्य याचं अभूतपूर्व दर्शन आपण सर्व घडवत आहात. या एकजुटीमुळेच आपण नक्की जिंकणार असा मला आत्मविश्वास आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.


उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “मी सातत्याने सांगतोय महाराष्ट्र सरकार खंबीर आहे. खंबीरपणे आणि धैर्याने या सगळ्यांचा मुकाबला करत आहे. जे जे काय शक्य आहे ते सर्व आपण करत आहोत. सकाळचा आकडा बघितला तर 2334 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. या आकड्यांमध्ये ज्यांना क्वारंटाईनमध्ये परत जाऊ दिलं आहे ते वेगळे पण जे पॉझिटिव्ह होते त्यांना बरं करुन घरी पाठवलं अशा रुग्णांची संख्या 230 आहे. साधारणत: 32 थोडेसे गंभीर आहेत. मात्र, त्यांचीदेखील प्रकृती स्थिर आहे.”

आज मी दोन जणांशी बोललो. एक 6 महिन्यांचा चिमुकला तनिश मोरेच्या आईशी बोललो. 6 महिन्याच्या बाळाने कोरोनाला हरवलं. 6 महिन्याचं बाळ कोरोनावर मात करु शकतं म्हणजे आपण कोरोनाविरुद्ध जिंकू शकतो. या 6 महिन्याच्या बाळानंतर मी 83 वर्षाच्या आजीशी बोललो. त्यादेखील बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत. 6 महिने ते 83 वर्ष वयाच्या लोकांनी कोरोनावर मात केली. त्यांनी ते करुन दाखवलं आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.


देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन

कोरोनामुळे भारतातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना याबाबतची घोषणा केली. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या पहिल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस होता. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी देशाला संबोधित केलं. (PM Narendra Modi speech lockdown). यावेळी पंतप्रधानांनी लॉकडाऊनमध्ये पाळलेल्या संयमाबद्दल देशवासियांचे आभार मानले. तसंच मोदींनी देशातील कोरोनाची स्थिती पाहता देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली.

Best IT Comany In Maharashtra , Solapur