ग्रीन झोन करोना विरहीत ठेवणं हे मोठं आव्हान – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
261

ग्रीन झोनमधील निर्बंध आणखी शिथिल करणार, रेडझोनला दिलासा नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ग्रीन झोन करोना विरहीत ठेवणं हे मोठं आव्हान – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज पुन्हा एकदा राज्यातील नागरिकांसोबत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. संवाद साधत असतांना त्यांनी वाढवण्यात आलेल्या लॉकडाऊन थोडाफार शिथिल करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

तसेच पंतप्रधान मोदींच्या भाषेत महाराष्ट्र आत्मनिर्भर करण्यासाठी आता ग्रीन झोनमधल्या लोकांनी पुढे यावं असं त्यांनी म्हंटल आहे. आतापर्यंत तुम्ही महाराष्ट्र वाचवण्यासाठी घरात राहिलात सरकारनं दिलेल्या सूचनांचे पालन केलं आणि कोरोनाशी लढा दिला. मात्र आता ग्रीनझोनमध्ये मनुष्यबळ कमी पडल्यास ग्रीन झोनमधल्या माणसांनी पुढे या असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे.

ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये आणखी काही निर्बंध शिथिल होणार, असं त्यांनी म्हंटल आहे. मात्र महापालिका क्षेत्रातल्या रेड झोन क्षेत्रांमध्ये निर्बंधांमध्ये फारशी शिथिलता आणता येणार नाही, असंही त्यांनी बोलतांना म्हंटल आहे. सध्या महाराष्ट्रात 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये कुणालाही डांबून ठेवण्याचा आमचा उद्देश नाही असं त्यांनी म्हंटल आहे. राज्यभरात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जर आपण लॉकडाऊन केलं नसतं, संचारबंदी केली नसती तर रुग्णसंख्या किती झाली असती, किती लोकांनी आपला जीव गमवला असता याची कल्पना न केलेलीच बरी असं त्यांनी म्हंटल आहे. लॉकडाऊन हा गतिरोधक म्हणून काम करत असल्याचं त्यांनी नागरिकांना सांगितलं आहे. 

सध्या महाराष्ट्रात लॉकडाऊन असला तरी आजपर्यंत 50 हजार उद्योग सुरू झाले असून 5 लाख मजूर आणि कामगार काम करू लागले आहेत. 70 हजार उद्योगांना परवानगी दिली असली तरी महापालिका क्षेत्रात निर्बंध अजूनही कडक आहेत. महापालिकांच्या व्यतिरिक्त इतर भागात उद्योग सुरू झाले आहेत असल्याचंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्र्यांचे भाषण जसेच्या तसे

केंद्र सरकारने जाहीर करण्याआधीच महाराष्ट्रातला लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्यात आला होता. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण मुंबईत अशी परिस्थिती सध्या राज्यात आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्यामुळे सर्व यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात चौथा लॉकडाऊन कसा असेल, कोरोनाची परिस्थिती काय आहे याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातल्या जनतेशी ऑनलाईन लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला.

आज आमदार झालो, ते तुमच्या सगळ्याच्या आशिर्वादाच्या जोरावर झालोय. कोरोनासोबत सुरू असलेल्या या युद्धाच्या परिस्थितीत ही निवडणूक बिनविरोध पार पाडायला ज्यांनी मदत केली, त्यांना मी धन्यवाद देतो. पंतप्रधानांनी ३१ मेपर्यंत देशभरात आणि महाराष्ट्रातही लॉकडाऊन लागू केला आहे. तुम्हाला वाटत असेल, की मी आलो, की लॉकडाऊनच जाहीर करतोय की काय. काही म्हणत असतील, की मुख्यमंत्र्यांकडे या कोरोनावर काही उत्तरच नाहीये. पण जगात कुणाकडे यावर उत्तर नाहीये. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई, ठाणे, नाशिक, मालेगावमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. पण मग आपण आत्तापर्यंत केलं तरी काय? जर आपण हे लॉकडाऊन केलं नसतं, तर किती प्रमाणात कोरोना पसरला असता, हा अंदाज लावणं कठीण आहे. कोरोना संपवला जरी नसला, तरी त्याच्या वाढीवर आपण नियंत्रण नक्कीच ठेवलं आहे. ग्रीन झोनमध्ये आपण हळूहळू निर्बंध शिथिल करत आहोत. ऑरेंज झोनमध्येही काही प्रमाणात शिथिलता आणली आहे. पण रेड झोनमध्ये कंटेनमेंट झोन असलेल्या ठिकाणी शिथिलता आणणं शक्य होणार नाही. असं मुख्यमंत्री म्हणाले.

आजपर्यंत राज्यात ५० हजार उद्योग सुरू करायला आपण परवानगी दिली आहे. या उद्योगांमध्ये ५ लाख मजूर काम करतात. सगळं ठप्प आहे. पण त्यात उद्योग वाचवण्यासाठी आपण भरारी घेणारच आहोत. नव्या सरकारला ६ महिने झाले आहेत. अर्थसंकल्पात आपण नवीन गोष्टी जाहीर केल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीच्या आधीच कोरोनाचं संकट आलं. पण त्या योजना आपण अंमलात आणणारच आहोत.

महाराष्ट्रात ४० हजार एकरहून जास्त जमीन नव्या उद्योगांसाठी राखीव ठेवली जाणार आहे. प्रदूषण न करणाऱ्या उद्योगांना सुरू करताना कोणत्याही परवानगीची अट ठेवली जाणार नाही. फक्त प्रदूषण करायचं नाही ही अट ठेवली आहे. कोरोनानंतर जग बदलणार आहे. कदाचित या नवीन उद्योगांना जमीन खरेदी जमणार नाही. मग त्यांना भाडेतत्वावर जमीन देण्याची तयारी आहे.

ग्रीन झोन कोरोनाविरहित ठेवणं हे आपल्यासमोर एक आव्हान आहे. त्याशिवाय रेड झोन लवकरात लवकर ग्रीन झोन करणं हेही आपलं काम आहे. उद्योगांना कामगारांची उणीव आहे. बरेच परराज्यातले कामगार निघून गेले आहेत. इथे मी आपल्या भूमीपुत्रांना आवाहन करतो, की जिथे ग्रीन झोन आहे, तिथे तुम्ही आत्मनिश्चयानं बाहेर पडायला हवं. उद्योगांना मनुष्यबळ कमी पडत असेल, तर भूमिपुत्रांनी महाराष्ट्र आत्मनिर्भर करण्यासाठी पुढे आलं पाहिजे. असं आवाहनही मुख्यमंत्री यांनी केले.

बीकेसीमधलं १००० खाटांचं कोविड सेंटर येत्या एक ते दोन दिवसांत सुरू होईल. मुंबईत आणखीन काही ठिकाणी असेच केंद्र सुरू केले जाणार आहेत. इथे जे जे आवश्यक असेल, ते तिथे पुरवले जाणार आहे. ऑक्सिजनची सुविधा असलेले जास्तीत जास्त बेड उपलब्ध करून दिले जाणार आहेत. शिवाय, इथे आयसीयू बेड्स देखील असणार आहेत. इतर ठिकाणी कुठेही नसेल, अशी आरोग्य सुविधा आपण निर्माण केली आहे.

राज्यात १४८४ कोविड केअर सेंटर, अडीच लाख बेड्स उपलब्ध करत आहोत. काही वेळेला असं वाटतं की रुग्णांना बेड मिळत नाही. कारण रुग्णांची संख्या वाढती आहे. पण त्यासाठी आपण पुढच्या महिन्यात किती रुग्ण होऊ शकतील, यासाठी प्रयत्न करत आहोत. मुंबईत आज १९९६७ रुग्ण आहेत, पण त्यातले ५ हजार रुग्ण घरीपण गेले आहेत. जर हे रुग्ण लवकर आले आणि त्यांच्यावर व्यवस्थित उपचार झाले, तर बरे होऊन जाणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू शकते.

मी जर समजा लॉकडाऊन उठवला, लोकं ये–जा करू लागले आणि त्यातून ही साथ पसरली तर इतर देशांसारखी परिस्थिती इथे होऊ शकते. यातून मी टिकेचा धनी होईन. पण महाराष्ट्रासाठी वाईटपण घ्यायला माझी तयारी आहे. जर रेड झोनमध्ये उद्योगधंदे सुरू केले, तर तिथे साथ मोठ्या प्रमाणात पसरेल. त्यानंतर जो लॉकडाऊन लागू होईल, तो अनिश्चित काळासाठी असेल. असं मुख्यमंत्री म्हणाले

इतर राज्यात जाणाऱ्या मजुरांची आपण व्यवस्थित काळजी घेत होतो. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण देत होतो. पण मजुरांची इच्छा होती की त्यांना घरी जायचंय. आज ५ लाखापर्यंत मजुरांना ट्रेन किंवा बसने आपण त्यांच्या राज्यात पाठवलं आहे. त्यांच्याकडून आपण कोणत्याही प्रकारे तिकिटाचे पैसे घेतले नाहीत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आणि काही संस्थांच्या माध्यमातून त्यांच्या तिकिटांचे पैसे आपण दिले आहेत. पण अजूनही काही मजूर रस्त्यांवरून चालत जात आहेत. का चालत जाताय? आपण सगळ्या मजुरांना परत पाठवण्याचा प्रयत्न करत असून मजुरांसाठी बस आणि रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोरोनासोबत जगायचं म्हणजे काय करायचं? आमची तयारी आहे, पण कोरोनाची तयारी आहे का आम्हाला त्याच्यासोबत जगू द्यायची? कोरोनानंतर जग बदलणार आहे. कसं बदलणार? तर घराबाहेर राहताना सावध राहा असं ठरवावं लागेल. घराबाहेर पडताना नियमित मास्क वापरणं, हात सतत धुवत राहणं, तोंडाला–चेहऱ्याला हात लावायचा नाही, अशा गोष्टी आपल्याला पाळाव्याच लागतील.

कंटेनमेंट झोनमध्ये लोकं कारण नसताना बाहेर पडत आहेत. धार्मिक सण, उत्सवांना अजूनही आपण परवानगी दिलेली नाही. एकमेकांमध्ये दोन हातांचं अंतर ठेवणं गरजेचं आहे.

ग्रीन झोनमध्ये जवळपास सगळी बंधनं शिथिल केली आहेत. सगळी दुकानं देखील सुरू करण्याची मुभा दिली जाईल. कोणतीही गोष्ट सुरू करताना शांतपणे वागायचं आहे. इतर देशांमध्ये गोष्टी सुरू केल्यानंतर लगेच गर्दी झाली आणि पुन्हा लॉकडाऊन लागू करावा लागला. तसं इथे करावं लागू नये, यासाठी नियोजन करावं लागेल कोणत्याही परिस्थितीत हे संकट पावसाळ्याआधी संपवायचंय. पुन्हा जनजीवन रुळावर आणायचंय. पण याची खात्री वाटतेय की त्यासाठी काही काळ जावा लागेल. जितकी सहनशीलता आपण दाखवू, तितकं लवकर आपण यातून बंधनमुक्त होऊ.

Best IT Comany In Maharashtra , Solapur