बार्शी तालुका आढावा बैठक
ग्रामसेवक, तलाठी अन कृषी सहाय्यक यांच्या वेळापत्रकाचे फलक प्रत्येक गावात लावा
खासदार ओम राजेनिंबाळकर यांची अधिकाऱ्यांना सूचना
बार्शी- येत्या काळात ग्रामस्थांकडून प्रशासकीय कामाबाबत तक्रार येता कामा नये. गावकऱ्यांची कामे वेळेत झाली पाहिजेत यासाठी ग्रामसेवक, तलाठी , कृषी सहाय्यक यांच्या वेळापात्रकाचे फलक प्रत्येक गावात लावा, अशा सूचना खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत बार्शी तालुक्यातील विविध विकास कामे,प्रशासकीय कामात नागरिकांना येणारे अडथळे या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली. या आढावा बैठकीसाठी आमदार राजेंद्र राऊत,नगराध्यक्ष ऍड. असिफ तांबोळी, तहसीलदार प्रदीप शेलार, सभापती अनिल डिसले, गटविकास अधिकारी शेखर सावंत उपस्थित होते.
रोजगार हमी योजनेची कामे तसेच कामावरील मजुरांच्या पगारीत वाढ व्हावी अशी मागणी आमदार राऊत यांनी केल्यानंतर निश्चितपणे यात वाढ करण्याबाबत पाठपुरावा करू असे निंबाळकर म्हणाले. रोजगार हमी योजना या अंतर्गत १३८ गावात प्रत्येकी २ कामे मंजूर करावीत, अशी सूचनाही खासदार निंबाळकर यांनी तहसीलदार प्रदीप शेलार व गटविकास अधिकरी सावंत यांना केली.
भूसंपादन कार्यालयात जमीन मोजणीचे २०० अर्ज प्रलंबित असल्याची माहिती मिळाल्यानंतर येत्या ३ महिन्यात ते तात्काळ निकाली काढावेत आशा सूचना भूमी अभिलेख च्या उपअधीक्षक सोनल काळे यांना केल्या.

विकास निधी खेचून आणण्यासाठी आम्हा लोकप्रतिनिधींना जीवाचे रान करावे लागते. हा निधी वाया जाऊ नये यासाठी तालुक्यात सुरू असलेल्या विकास कामांत निकृष्ट दर्जा याबाबत सर्व घटकांनी सावध राहावे, तसेच
शाळा, महाविद्यालयातील मुलींच्या संरक्षणाबाबत पोलिसांनी काळजी घ्यावी अशी सक्त सूचना निंबाळकर यांनी पोलिस अधिकाऱ्यांना केली. यावेळी उपजिल्हा रुग्णालयासंबंधी अधीक्षक डॉ. शीतल बोपलकर यांच्याकडून सद्यस्थितीतील माहिती घेतली. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या वतीने तालुक्यातील रस्त्यांच्या कामाचे चांगले नियोजन केले असल्याबद्दल उपअभियंता अमोल तिटवे यांचे कौतुक केले.
आढावा बैठकीत केलेल्या सूचना अन अनुपस्थित अधिकाऱ्यांची नावे नोंद करा
या आढावा बैठकीत तहसिलदार प्रदीप शेलार यांच्या बेजबाबदारपणा, निष्काळजीपणाचा समाचारही खासदार निंबाळकर यांनी घेतला. आढावा बैठकीत पत्र देऊनही अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे कळवा. यावबैठकीत नागरिकांनी विचारलेले प्रश्न व मी अधिकाऱ्यांना केलेल्या सूचना याच्या अचूक नोंदी कराव्यात , मी त्या पाहणार आहे. माहिती घेऊन अशा बैठकांना येत जावा.
शासकीय निधीचा शेतकऱ्यांना पहिला हप्ता दिल्यानंतर उर्वरित किती शेतकरी राहिले हे हेसुद्धा तहसीलदार म्हनून नीट सांगता येत नाही याचे नवल वाटते, असे सांगत खासदारांनीच हिशेब करून त्यांना आकडा सांगितला.
सरपंच पंडित मिरगणे यांनी तहसीलदार शेलार यांची बदली करा, अशी मागणी केली , तेव्हा सभागृहात टाळ्या वाजल्या. रेशन दुकानदार माल घेतल्यानंतरर पावत्या देत नाहीत याकडे धैर्यशील पाटील यांनी खासदार निंबाळकर यांचे लक्ष वेधले.
टेम्भुर्णी ते येडशी रस्ता प्रलंबितचा विषय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर आपण ठेऊ. भाजपशी आमदार राजेंद्र राऊत यांचे चांगले संबंध असल्याने केंद्रातील कामावेळी आमदार राऊत यांची मदत घेऊ, असेही निंबाळकर म्हणाले .यावेळी विकास गरड, पांडुरंग घोलप, नानासाहेब पाटील, आदीनी विविध मागण्या केल्या.
शहराचा रुसवा निघावा यासाठी आमदार निधीतून १ कोटी रुपये शहरातील रस्त्यांसाठी दिले आहेत. यात खासदार म्हणून ओम राजेनिंबाळकर यांनीआणखी १ कोटी रुपये द्यावेत अशी मागणी आमदार राजेंद्र राऊत यांनी केली.