गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा: चंद्रकांत पाटील

0
196

पालघर: ‘पालघर जिल्ह्यात पोलिसांच्या साक्षीने दोन साधूंची जमावाकडून हत्या झाल्याची मॉब लिंचिंगची घटना अत्यंत धक्कादायक आणि निषेधार्ह आहे. राज्यात वारंवार कायदा सुव्यवस्थेची समस्या निर्माण होत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी व या घटनांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.’ अशी थेट मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
 
‘पालघरच्या घटनेची मुख्यमंत्र्यांना सरकारी यंत्रणेकडून तातडीने माहिती मिळाली असेलच. तथापि, याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः विचारणा केली, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आवाज उठवला आणि सोशल मीडियावरून या प्रकरणी सरकारची नाचक्की झाली त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी बोलले. या गंभीर घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने स्वतः जनतेशी संवाद साधायला हवा होता. तरीही त्यांनी चार दिवस वेळ लावला.’ अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे.
 
‘राज्यात गेल्या काही दिवसात गंभीर घटना घडल्या आहेत. ठाण्यात एका तरुणाला एका मंत्र्याच्या बंगल्यात नेऊन मारहाण करण्यात आली. हजारो कोटींच्या गैरव्यवहारात तपास यंत्रणांना हवा असलेल्या आरोपीला राज्याच्या गृहखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून लॉकडाऊनच्या काळात सवलत देण्यासाठी पत्र देण्यात आले. लॉकडाऊनमुळे संचारबंदी असताना तसेच चौकाचौकात पोलिसांचा बंदोबस्त असतानाही मुंबईत बांद्रा येथे हजारोंचा जमाव जमला.

आता पालघर जिल्ह्यात पोलिसांच्या साक्षीने साधूंचे हत्याकांड झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनांबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून वरील घटनांची निःपक्ष चौकशी करावी.’ अशी मागणी चंद्रकांत पाटलांनी केली आहे. 

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

Best IT Comany In Maharashtra , Solapur