कर्मवीर व्याख्यानमाला पुष्प दुसरे
खरा राष्ट्रवाद समाजाला सांगण्याची गरज : डॉ. विश्वंभर चौधरी
बार्शी : उदारमतवादी, सहिष्णु आणि सर्वसमावेशक भारतीय समाजाला जातीयवादी आणि धर्मांध बनविण्याचा प्रयत्न जोरात सुरु आहे. त्यामुळे भारतीय राज्यघटनेची मूल्यात्मकता सवार्ंपर्यंत पोहचवून खरा राष्ट्रवाद समजून सांगण्याची गरज आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यंानी व्यक्त केले.
शिवशक्ती बँकेच्यावतीने डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कर्मवीर व्याख्यानमालेत भारतीय राज्यघटना आणि राष्ट्रवाद या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, सचिव विष्णू पाटील, सहसचिव प्रकाश पाटील, बँकेचे चेअरमन डॉ. प्रकाश बुरगुटेे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी डॉ. चौधरी म्हणाले, या देशावर शक, हून, यवन, इंग्रज यांची आक्रमणे झाली. पण या देशाने सर्वांना सामावून घेतले. पाचशे संस्थानांमध्ये विखुरलेला हा देश स्वातंत्र्यानंतर एक झाला. विविधतेत एकात्मता हे वैशिष्ठ्य असलेल्या या देशात 70 वर्षे लोकशाही टिकून आहे. कारण या देशात दक्षिणेत महिषासूर आणि उत्तरेत महिषासूर मर्दिनीला पुजले जाते, पण सर्वांच्या धार्मिक सांस्कृतिक बदलांबाबत आदरभाव हे या देशाचे वैशिष्ट्य आहे. गेल्या 20 वर्षात महात्मा गांधी, पंडित नेहरु, सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांच्या विचारांचे विकृत आणि विपर्यस्त चित्र रंगविण्याचे नियोजनबध्द प्रयत्न सुरु आहेत. ज्यांनी राष्ट्रगीत नाकारले, राष्ट्रध्वज नाकारला.

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात कधीच सहभाग दिला नाही. अशा संघटना आज देशाला राष्ट्रवाद शिकवित आहेत. या देशाच्या राज्यव्यवस्थेने नागरिक नव्हे तर मतदार बनविण्याचे काम केले. त्यामुळे शालेय जीवनात इयत्ता 5 वी पासूनच भारतीय राज्यघटना आणि नागरीकशास्त्र हे स्वतंत्र विषय अभ्यासक्रमात आणण्याची गरज आहे. इतिहास हे जिवंत शास्त्र असते. तो अस्सलपणे समाजापुढे मांडला गेला पाहिजे. आज व्हॉटसअप युनिर्व्हसिटी महापुरुषांच्या विचारांचे ट्रोल करुन विखारी आणि विषारी प्रचार करते आहे. महापुरुषांच्या विचारांची निरर्थक चिकित्सा करुन सामाजिक आणि वैचारिक ङ्गाळणी सुरु आहे. आण्णा हजारें सारख्या व्यक्तींनी कोणतेही पद नसताना या देशात 7 कायदे अंमलात आणायला संसदेला भाग पाडले. निरपेक्ष समाजकारण्यांची आज देशाला गरज आहे. संधी मिळाली तर नि:स्वार्थी राजकारणी काय करु शकतो? हे केजरीवाल यांनी दिल्लीत दाखवून दिले.
आज देशात नागरिकत्व दुरुस्ती व नोंदणी कायद्याच्या नावाखाली हिंदु मतांच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरु आहे. भारतीय मुसलमान कधीच राष्ट्रद्रोही नव्हता, पण हिंदूंना मुस्लीम एैक्याची भिती दाखवून मतांचे राजकारण करण्याचा डाव सुरु आहे. टीआरपी वाढविण्यासाठी वाट्टेल त्या विषयांवर प्रबोधनहीन चर्चा घडविणारी माध्यमे सामाजिक अशांततेला कारणीभूत ठरण्याचा धोका आहे. त्यामुळे अशा चर्चासत्रामध्ये सहभागी व्हावे असे वाटत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. हिंगणघाट सारख्या घटनांची पुनर्रावती होवू नये यासाठी हैद्राबादच्या धर्तीवर शिक्षा द्यावी, ही सोलापूरातील एका लोकप्रतिनिधीने केलेली मागणी ही विधीमंडळाचे सदस्य म्हणून घटनाबाह्य आहे.
मात्र अशा विकृती ठेचून काढण्यासाठी तीन महिन्यात अशा घटनांचा तपास करुन जलदगती न्यायलयात ही प्रकरणे चालावीत, यासाठी कायदा होण्याची गरज आहे. महापुरुषांचे केवळ अत्युच्च पुतळे आणि भव्य स्मारके बनविण्यापेक्षा अभ्यासकेंद्र आणि ग्रंथालये बनविण्याची गरज असून भ्रष्टाचार आणि हिंसाचारामध्ये अग्रभागी असलेल्या या देशातील एकही विद्यापीठ जगातील पहिल्या दोनशे विद्यापीठांच्या यादी मध्येही का पोहचू शकत नाही. याचा विचार करण्याची गरज आहे. असेही परखड मत डॉ. चौधरी यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सरव्यवस्थापक एकनाथ माने, व्यवस्थापक भारत उमाटे, समाधान राऊत आदींनी परिश्रम घेतले.