जमावबंदी असूनही लोक रस्त्यावर आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली चिंता व्यक्त
नवी दिल्लीः जगभरात कोरोनाचा धोका वाढत आहे. 14 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मागच्या दोन दिवसांत भारतातही कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 400 च्या जवळपास पोहोचली आहे. तर महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण 89 आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्ये लॉकडाऊन झालेत. त्यामुळे सर्व स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कठोर शब्दात ट्विट केलं आहे. जमावबंदी असूनही लोक रस्त्यावर आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे.
अनेक लोक लॉकडाऊनला अद्यापही गांभीर्याने घेत नसल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. तर स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका, असा दम मुख्यमंत्र्यांनी भरला आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जवळपास देशभरातील 22 राज्य आणि 80 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचे आदेश देण्यात आलेत. इतकी गंभीर परिस्थिती असतानाही लोकांनी याचं गांभीर्य ओळखायला हवं यासाठी मोदींनी कठोर शब्दात आज सकाळी ट्विटरवर जनतेला पुन्हा एकदा आवाहन केलं आहे.

केंद्र आणि राज्य सरकारनं लॉकडाऊनचे आदेश देऊनही अनेक जण बाहेर फिरताना दिसत आहेत. काही जण कामाविना फिरताना आढळून आले आहेत. लॉकडाऊनला अजूनही गांभीर्यानं घेतलं नाही. मात्र जनतेनं हे गांभीर्यानं घ्यायला हवं. सरकारननं दिलेल्या आदेशांचं पालन करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. राज्य सरकारनं आपल्या स्तरावर नियमांचं कठोरपणे पालन करण्याचे आदेशही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले आहेत.
पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं की, अनेक लोक लॉकडाऊनला अजूनही गांभीर्याने घेत नाहीत. कृपया करुन स्वत:ला वाचवा, तुमच्या कुटुंबाला वाचवा, आदेशांचं गांभीर्याने पालन करा. राज्य सरकारांना माझी सूचना आहे की त्यांनी नियम आणि कायदा पाळायला भाग पाडावं.
संपूर्ण महाराष्ट्रात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे चिंतेचं वातावरण असलं तरीही सरकारकडून हा प्रादूर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. बस, लोकल, मेट्रो, खासगी ऑफिसेस, शाळा, कॉलेज, मैदान, गार्डन सर्व बंद करण्यात आलं आहे. अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा सुरु ठेवण्यात येणार असल्यानं नागरिकांनी सरकारला सहकार्य करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही लोकांना गर्दी करुन कायदा मोडू नका, असं आवाहन केलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या. स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका. 144 कलम लावले आहे त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. रस्त्यांवर वाहने आणून गर्दी करून कायदा मोडू नका.