कोरोना व्हायरस:लॉकडाऊन गरजेचे का आहे ? वाचा सविस्तर-

0
333

विशेष लेख

लॉकडाऊन गरजेचे का आहे ? वाचा सविस्तर-

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

भारतामध्ये कोरोनाचा दिवसेंदिवस प्रसार सार्वत्रिक होत आहे.याच पार्श्वभूमीवर 14 एप्रिल पर्यंत संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे.परंतु, सर्वसामान्यांना एक महत्त्वाचा प्रश्न पडत आहे.तो म्हणजे लॉकडाऊन म्हणजे काय? लॉकडाऊन कशासाठी? याची गरज काय आहे? चला या सर्व प्रश्नांची उत्तरे सोप्या उदाहरणावरून समजून घेऊया !

लॉकडाऊन म्हणजे काय:

सार्वजनिक वावर बंद करून जो ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी थांबणे म्हणजेच लॉकडाऊन. यामध्ये जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवेसाठी परवानगी देण्यात येते.

लॉकडाऊन कशासाठी :

आजच्या परिस्थितीत लॉकडाऊनचा प्रमुख उद्देश म्हणजे कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, रुग्ण शोधणे सोपे जावे, हा आहे.

लॉकडाऊनची गरज का आहे.हे आपण एका उदाहरणावरून समजून घेऊ या…

हे उदाहरण आहे अ आणि ब व्यक्तीचे. हे दोघेही कोरोना संसर्ग अर्थात लागण झालेल्या देशातून प्रवास करून भारतात परत येतात. विमानतळावर सर्व प्रवाशांची सविस्तर माहिती घेऊन होम क्वॉरंन्टाईनचा शिक्का मारण्यात येतो. पुढील 14 दिवस घरात कोणाच्याही संपर्कात येता राहण्याच्या सूचना देण्यात येतात. या प्रक्रियेतून अ व्यक्ती जातो आणि घरी जाऊन 14 दिवस स्वतःला वेगळ्या खोलीमध्ये अलग करून घेतो. अर्थात होम कॉरेन्टाईन होतो.

परंतु, अ व्यक्तीची आई – बाबा, पत्नी, मुले त्याच्यावर एकत्रित राहण्याचा दबाव आणतात. यावर अ व्यक्ती आपल्या कुटुंबातील सदस्यांना सांगतो की, मी कोरोना बाधित देशातून आलो आहे. मला 14 दिवस होम क्वॉरंन्टाईन करण्यात आले आहे. त्यामुळे मी इतर कोणत्याच व्यक्तीसोबत संपर्कात येणार नाही. याची परिपूर्ण दक्षता घेईल…

पुढच्या पाच ते सहा दिवसातच अ व्यक्तीला सर्दी, खोकला, ताप असे लक्षणे दिसून येतात. यामुळे तो आरोग्य विभागाला याविषयीची माहिती देतो. त्यानंतर आरोग्य विभागाचे पथक येऊन त्या व्यक्तीचे नमुने तपासणीसाठी पाठवतात. तपासणीअंती असे निदर्शनास येते की, अ व्यक्ती हा कोरोना पॉझिटिव्ह आहे. नंतर घरातील सर्व व्यक्तींची कोरोना तपासणी केल्या जाते. यामध्ये या सर्व व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह येतात.नंतर अ व्यक्तीवर योग्य उपचार होऊन पुन्हा तपासणी केल्यावर काही दिवसातच तो बरा होतो.

आता येवूया ब व्यक्तीकडे, ब व्यक्ती हा आपल्या समाजातील ‘मुझे कुछ नही होता ‘ या पंथातील अमर विचाराचा असतो. ब व्यक्ती देखील काही कामानिमित्त परदेशात जावून परत आला. विमानतळावर ब व्यक्तीची सुद्धा सर्व प्रक्रिया पूर्ण झाली. त्याला होम क्वॉरंन्टाईन करण्यात आले. 14 दिवस घरातच राहून योग्य ती काळजी घेण्याची सूचना केली गेली.

या व्यक्तीने या सर्व सूचना पायदळी तुडवल्या. दुर्लक्ष केले. या व्यक्तीने घरी जाऊन कुटुंबाला कोरन्टाईन सूचना विषयी सांगितलेच नाही. वेगळ्या खोलीमध्ये न राहता सर्व घरातील सदस्यांसोबत वावर केला. आणि आपला दैनंदिन व्यवसाय सुरू केला.यामध्ये त्याच्या संपर्कात, त्याच्या व्यवसायात काम करणारे कामगार व ग्राहक आले. 2 ते 3 दिवसानंतर ब व्यक्तीला सर्दी, खोकला, ताप यायला सुरुवात होते आणि तो उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये जातो.

नंतर त्याची कोरोना तपासणी केल्या जाते.यामध्ये ब व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून येतो.तेव्हा आरोग्य विभागाचे पथकाला धक्का बसतो. त्याच्या संपर्कात आलेल्या शेकडो व्यक्तींचा शोध घेणे सुरु होते. त्याच्या घरातील सर्व सदस्य पॉझिटीव्ह निघतात. शेजारी, मित्र, ग्राहक, घरी काम करणारे कितीतरी लोक अजाणता कोरोना पॉझिटिव्ह होऊन जातात.

निष्काळजीपणाने वागणाऱ्या ब व्यक्तीपासून सर्व परिसरात पसरतो.

या अ आणि ब व्यक्तींच्या प्रसंगांमध्ये दोन गोष्टी प्रामुख्याने दिसून येतात, एक म्हणजे अ व्यक्तीने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन केले. मात्र आता ब व्यक्तींकडून किती लोकांना लागण झाली आहे हे तपासण्यासाठी संपूर्ण शहर लॉकडाउन करणे, अर्थात पुढे ही लागण होण्याची श्रृंखला तोडण्यासाठी बंद करणे गरजेचे आहे. किंवा ब व्यक्ती देशात आली असती व देश लॉकडाऊन असता तर ब व्यक्ती घरातच राहिली असती… आणि त्याने त्यांचा व्यवसाय सुरु केला नसता .आणि कोरोना विषाणूचा प्रसार त्याच्या आणि त्याच्या कुटुंबा पर्यंतच मर्यादित राहिला असता.

सध्या आम्ही भारतीय याच परिस्थितीत आहोत. आम्ही या ब व्यक्तीपासून लागण झालेल्या लोकांच्या शोध घेत आहोत.आम्हाला हे माहिती नाही की कोणाला कोरोनाची लागण झाली आहे. ज्यांना झाली आहेत. त्यांना देखील ही बाब माहिती नाही... आणि लॉकडाऊन केले नाही तर जेव्हा हजारो आजारी पडतील त्याच वेळेस ही बाब माहिती होईल. त्यामुळे कोणत्या घरात आजारी कोण पडले आहे, याची माहिती सध्या आरोग्य विभाग घेत आहे. म्हणून माहिती लपवू नका. ती जीवघेणी ठरू शकते.

सर्वजण घरी बसल्याशिवाय आपल्यातले कोरोनाबाधित नेमके लोक किती हे कळणार नाही. त्यांच्यावर लगेच उपचार करता येईल. तसेच हा संसर्ग मर्यादित ठेवणे शक्य होईल. त्याचसाठी इटली ,अमेरिका, स्पेन आदी प्रगत देशांनी जी चूक केली ती चूक भारतीयांनी करू नये, यासाठी देशभर सर्व दळणवळण यंत्रणा बंद केली आहे. यातून नेमके बाधीत कळतील. नवीन बाधा होणार नाही.बाधीत झाले त्यांना दुरुस्त करता येईल.

 तेव्हा लॉकडाऊन म्हणजे, जसे आहात त्या स्थितीत घरातच राहणे होय. एक जबाबदार भारतीय म्हणून हा लॉकडाऊन देशासाठी पाळणे आवश्यक आहे.

प्रवीण टाके
जिल्हा माहिती अधिकारी, चंद्रपूर

Best IT Comany In Maharashtra , Solapur