कोरोनामुळे आणखी दोन पोलिसांना गमवावे लागले आपले प्राण
सुरज गायकवाड
ग्लोबल न्यूज: राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्याच बरोबर आता कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी पार पडणाऱ्या पोलिसांना सुद्धा कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आढळून येत आहे.

राज्यात आज एका दिवसात तब्बल 79 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दोन पोलिसांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 12 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 140 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. मात्र, त्यांनादेखील आता कोरोनाची लागण होत आहे. गेल्या तीन दिवसांत 196 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. आज (16 मे) एका दिवसात 79 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे.
तर काल एका दिवसात 60 पोलिसांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 1 हजार 140 वर पोहोचला आहे. यात 120 अधिकारी आणि 1020 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कोरोनाची लक्षण असणाऱ्या पोलिसांची संख्या मोठी आहे.
आतापर्यंत 88 अधिकारी आणि 774 पोलीस कर्मचारी अशा एकूण 864 पोलिसांत लक्षण दिसून येत आहेत. तर 32 अधिकारी आणि 236 पोलीस कर्मचारी असे एकूण 268 जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर दुर्देवाने 12 पोलिसांचा मृत्यू झाला आहे.