कोरोनाचा प्रकोप झालेल्या दिल्लीतील इस्तेमामध्ये सात लोकांचा समावेश; ग्रामसेवकाला माहिती दिल्यामुळे केली मारहाण
बार्शी – कोरोना व्हायरस च्या संसर्गामुळे जग हैराण झाले आहे. भारतात ही गेल्या दोन दिवसांपासून कोरोना पाय पसरू लागला आहे.कोरोनाचा प्रकोप झालेल्या दिल्लीतील(,निजामोद्दीन दर्गा) इस्तेमामध्ये बार्शी तालुक्यातील पिंपरी (आर) येथील 7 लोक सहभागी झाले होते. या लोकांची माहिती स्थानिक ग्रामसेवकाला दिल्यामुळे एका वृद्धाला मारहाण केलीय. यामुळे खळबळ उडाली आहे.
बहादूर साहेबलाल पठाण ( वय 68) असे मारहाण झालेल्या वृध्दाचे नाव आहे. याबाबत बहाद्दूर पठाण यांच्या फिर्यादीवरुन वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.

दरम्यान या 7 जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. या इस्तेमामध्ये सहभागी झालेल्यांपैकी 24 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर आतापर्यंत 6 जण मृत्यू पावले आहेत. राज्यातील 200 जण यात सहभागी झाले होते. त्यातील107जणांचा आणखी शोध लागलेला नाही. त्यात हे सात जण जाऊन आल्याची माहिती समोर आली आहे.
पिंपरी आर येथील बंदेनवाज रमु शेख, फिरोज बंदेनवाज शेख , तुराब आप्पा सय्यद, जावेद तुराब सय्यद, बाशाभाई नबीलाल पठाण, रज्जाक बाशाभाई पठाण, इसाक उस्मान शेख असे या सातजणांची नावे आहेत. दिल्लीतील या मेळाव्यात देशातील अनेक राज्यातून लोक आले होते. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग करुन आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता हा मेळावा पार पडला. मेळाव्यात आलेले तेलंगणा राज्यातील 6 लोक कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. साहजिकच या मेळाव्यातून आलेल्या लोकांची वैद्यकीय तपासणी झाली आहे का? अशी विचारणा बहाद्दूर पठाण यांनी ग्रामसेवक नितीन वाघमारे यांना केली होती.
त्यावरुन ग्रामसेवकांने लागलीच या 7 जणांना वैद्यकीय तपासणीस उपस्थित राहण्याचा आदेश बजावला. त्यावर त्यांनी ही माहिती कोणी दिली? अशी विचारणा ग्रामसेवकाकडे केली. ग्रामसेवकाने बहाद्दूर पठाण यांचे नाव सांगितल्यानंतर या 7 जणांनी फिर्यादीच्या घरासमोर येवुन तु गावातील ग्रामसेवक यांच्याकडे आमचे वैद्यकीय तपासणीबाबत का चौकशी केली? याचा राग मनात धरुन फिर्यादी, त्याची पत्नी चांदबी बहादुर पठाण, मुलगा बिलाल बहादुर पठाण, मुलगी तबु व नसरीन यांना शिवीगाळी करुन लाथाबुक्क्याने व हातातील लाकडी काठीने मारहाण करुन जखमी केले.