केंद्राच्या आदेशाला डावलून महाराष्ट्र सरकारचं मोठं पाऊल..

0
281

महाराष्ट्र कोरोना व्हायसरशी लढताना वैद्यकीय साधनसामुग्रीचा तुटवडा भासत असल्याचं राज्य सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळेच राज्य सरकारनं आता खासगी उत्पादकांना ऑर्डर देणं सुरू केलं आहे.

2 एप्रिलला केंद्र सरकारने पत्र लिहून सर्व राज्यांना PPE किट्स, एन-95 मास्क आणि व्हेन्टिलेटर्स विकत घेण्यावर निर्बंध घातले. PPE किट्स, एन-95 मास्क आणि व्हेन्टिलेटरचा पुरवठा केंद्र सरकारकडून केला जाईल, अशी सूचना त्यात करण्यात आली होती.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या माहितीनुसार, “PPE आणि मास्कची गुणवत्ता योग्य असणं आवश्यक आहे. गुणवत्ता चांगली नसेल तर, डॉक्टर-नर्स यांना संसर्ग होऊ शकतो. त्यामुळेच केंद्राने राज्यांवर या वस्तू खरेदी करण्यावर निर्बंध घातले आहेत.”

पण याला आत 12 पेक्षा जास्त दिवस उलटून गेलेत. परिणामी महाराष्ट्राला अजूनही मदत न मिळाल्याने, राज्य सरकारने या वस्तूंची खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

राज्यात उत्पादन होणाऱ्या PPE किट्सची गुणवत्ता तपासण्यासाठी राज्य सरकारने आधी हाफकिन संस्थेची निवड केली होती. सर्व पुरवठादारांना त्यांचं उत्पादन हाफकिनकडून प्रमाणीत करून घेणं बंधनकारक करण्यात आलं होतं. मात्र, शुक्रवारी सरकारने हा निर्णय रद्द करण्याचं परिपत्रक काढलं.
वैद्यकीय शिक्षण विभागानं आता त्यासाठी नवी मानकं ठरवून आदेश जारी केले आहेत. त्यानुसार आता जिल्हास्तरावर या वस्तूंची खरेदी करता येणार आहे.

याबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख म्हणाले, “केंद्र सरकारने PPE किट्स खरेदी सुरू केलीये. त्यांच्याकडून या वस्तू मिळणार आहेत. पण आता जिल्हा स्तरावर खरेदीचे अधिकार देण्यात आले असून, पुरवठादारांसोबत दर करार केले जात आहेत.”

दुसरीकडे याबाबत बीबीसीशी बोलताना राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे अतिरिक्त संचालक, डॉ. तात्याराव लहान म्हणाले, “राज्य सरकारने PPE किट्ससाठी 5 आणि एन-95 मास्कसाठी 4 पुरवठादारांसोबत करार केला आहे. तसंच येत्या काही दिवसांत आम्हाला केंद्राकडूनही या गोष्टी मिळण्याची अपेक्षा आहे.”

दरम्यान PPE किट्स आणि एन-95 मास्कचं उत्पादन करणाऱ्या व्यापाऱ्यांनी फक्त महाराष्ट्रासाठीच उत्पादन करावं, यासंबंधीचे निर्बंध राज्य सरकार घालणार असल्याची माहिती, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्याने मागणी नोंदवली पण…

केंद्राच्या आदेशाबाबत बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, “केंद्राने नवीन आदेश जारी केलाय. राज्यांनी व्हेन्टिलेटर्स, PPE किट्स आणि एन-95 मास्क खरेदी करू नयेत. केंद्र सरकार राज्यांना या वस्तू उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राने येणाऱ्या काळात उपस्थित होणारी परिस्थिती लक्षात घेता, व्हेन्टिलेटर, मास्क आणि PPE किट्सची मागणी केंद्राकडे केली आहे.”

आरोग्यमंत्र्यांच्या माहितीनुसार राज्याने केंद्राकडे 2,142 व्हेन्टिलेटर्स, 3 लाख 14 हजार PPE (पर्सनल प्रोटेक्शन किट्स), 8 लाख एन-95 मास्क आणि 99 लाख ट्रिपल लेअर मास्कची मागणी केली आहे.

“आमची केंद्र सरकारकडे आग्रहाची मागणी आहे की, केंद्राने देशातून आणि जगभरातून या वस्तू तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात. यासाठी आम्ही केंद्रीय आरोग्य विभागाशी सातत्याने पाठपुरावा करत आहोत. आम्ही केंद्र सरकारला या गोष्टी कधी उपलब्ध होतील याबाबतचा निश्चित वेळ सांगण्याचीही विनंती केलीये. केंद्राला उशीर होत असेल तर आम्ही राज्यातील उत्पादकांकडून या गोष्टी घेणार आहोत,” असं आरोग्यमंत्री पुढे म्हणाले.

राज्यातील उपलब्ध साहित्यसाठा
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात 30 हजार PPE किट्स तसंच सरकारी आणि महात्मा ज्योतीबा फुले आरोग्य योजनेतील संलग्न रुग्णालय असे मिळून 3 हजारांपेक्षा जास्त व्हेन्टीलेटर आहेत.

तसंच 3 लाख एन-95 मास्क उपलब्ध आहेत. 25 लाख ट्रिपल लेअर मास्क उपलब्ध आहेत.
राज्यातला कोरोनाचा सततचा वाढता आकडा पाहाता रुग्णांची सेवा करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षेसाठी आणखी PPE किट म्हणजे पूर्ण शरीर झाकणारा सूट आणि एन-95 मास्कची गरज आहे.

दुसरीकडे केंद्र सरकारच्या माहितीनुसार, PPE किट्स, एन-95 मास्क आणि व्हेन्टिलेटरबाबत मंत्रिगटाच्या बैठकीतही चर्चा झाली आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, “देशात 39 PPE किट्स उत्पादन करणारे युनिट्स आहेत. तर 20 लाख एन-95 मास्क राज्यांना पुरवण्यात आले आहेत. शिवायच 1.7 कोटी PPE किट्स आणि 49 हजार व्हेन्टिलेटर्सची मागणी वेगवेगळ्या राज्यांकडून करण्यात आली आहे.”

साभार BBC News

Best IT Comany In Maharashtra , Solapur