उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याचा मृत्यू झाल्याच्या अफवा काही दिवसांपूर्वी उठल्या होत्या. त्यानंतर त्याचा ब्रेनडेड झाल्याचे वृत्त पसरले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्याच्या प्रकृतीची काही बातमी तुमच्याकडे आहे का? असे विचारले असता त्यांनीही सांगितले होते की ‘मला त्याची प्रकृती कशी आहे हे माहिती आहे, मात्र मी सांगणार नाही.’ यामुळे गोंधळात अजूनच भर पडली होती.
उत्तर कोरियाने याबाबत आतापर्यंत कोणतीही माहिती प्रसिद्ध केली नव्हती. शनिवारी सकाळी किम जोंग उनचे एका कार्यक्रमात सहभागी झाल्याचे फोटो प्रसिद्ध झाले आणि किम हा धडधाकट असून तो पूर्णपणे बरा झाल्याचे या फोटोंद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे कळते आहे.

किम जोंग उनने एका खतांच्या कारखान्याचे उद्घाटन केले, त्यावेळच्या जाहीर कार्यक्रमातील हे फोटो आहेत असं उत्तर कोरियातील माध्यमांनी दावा केला आहे. हा दावा यासाठी म्हणावा लागेल कारण उत्तर कोरियातील बातम्यांकडे जगातल्या इतर वृत्तसंस्था या खोडसाळपणे किंवा मुद्दाम प्रसारीत केल्या जात असल्याच्या संशयाने नेहेमी पाहात असतात. या वृत्तामध्ये म्हटलंय की किम जोंग उन हा जवळपास 20 दिवसांनंतर जाहीर कार्यक्रमात दिसला आहे.
त्याला पाहताच लोकांनी मोठा जल्लोष केला असं KCNA नावाच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. किम पुन्हा कार्यक्रमात दिसल्याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विचारलं असता त्यांनी ‘मला यावर आत्ता काहीही बोलायचे नाही’ अशी प्रतिक्रिया दिली.

KCNA च्या बातमीत काय म्हटलंय ?
Korean Central News Agency (KCNA) ने दिलेल्या बातमीत म्हटलंय की किमसोबत तिथलेअनेक उच्च पदस्थ अधिकारी होते. त्याची बहीण किम यो उन ही देखील त्याच्यासोबत होती. किमने प्योंगयोंग भागातील एका खतांच्या कारखान्याचीफिक कापून त्याचे उद्घाटन केले. यानंतर कार्यक्रमाला हजर असलेल्या लोकांनी एकच जल्लोष केला. किम याने कारखान्याच्या उत्पादन यंत्रणेबाबत समाधान व्यक्त केले असून या कारखान्याचे देशाच्या प्रगतीमध्ये असलेल्या योगदानाबद्दल कौतुकही केले.
15 एप्रिलच्या कार्यक्रमानंतर किमच्या प्रकृतीबाबतच्या अफवांना सुरुवात झाली
15 एप्रिलला किमचे आजोबा किम II सुंग यांची जयंती असते. यादिवशी भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येतो आणि किम जोंग उन या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावतो. तो कधीही हा कार्यक्रम चुकवत नाही. यावर्षी मात्र तो या कार्यक्रमात दिसला नव्हता. शिवाय त्याला काही दिवसांपासून तब्येतीचा त्रासही होत होता.
यावरून तो अत्यवस्थ असल्याच्या बातम्या पसरायला सुरुवात झाली होती. अमेरिकेतील काही माध्यमांनी यानंतर बातम्या प्रसिद्ध केल्या की किम जोंग उनवर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली असून तो मृत्यूच्या दारात उभा आहे. अमेरिकेचे संरक्षणमंत्री माईक पॉम्पिओ यांनी विधान केलं होतं की अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनाही किम जोंग उन बऱ्याच दिवसांत दिसला नाहीये. त्यांच्या या विधानामुळे किमचं नक्कीच काहीतरी वाईट झालं असावं या चर्चेला आणखीनच बळ मिळालं.