काही तासातच राजची ‘ही’ मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून मान्य; तात्काळ केली सुरुवात

0
256

मुंबई : देशभरासह राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे . मात्र दुसरीकडे कोरोनाच्या आजारातून ठणठणीत बरे होणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. या संदर्भातील माहिती योग्य प्रकारे प्रसिद्ध केल्यास लोकांना दिलासा मिळेल. डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवरचा विश्वास वाढेल. त्यामुळे आठवड्यातून एकदा सर्व राज्य सरकारांनी व केंद्र सरकारने त्याबाबतचे एक ‘न्यूज बुलेटिन’ काढावे, अशी महत्त्वपूर्ण सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

आता राज ठाकरे यांच्या मागणीची काही तासांतच मुख्यंमत्री उद्धव ठाकरेंकडून दखल घेण्यात आली आहे . आज प्रशासनाकडून ठणठणीत बरे झालेल्या रुग्णांची विस्तृत आकडेवारी जारी करण्यात आली. कोरोनाचा लढा सुरू झाल्यापासून राज ठाकरे हे सातत्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्कात आहेत . राज यांनी बुधवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांशी बोलून काही गोष्टी निदर्शनास आणल्या.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ‘कोरोनाच्या आजारातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या आश्वासक आहे. कल्याणमधील सहा महिन्यांच्या मुलीसह हजारो जण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, ह्या आकडेवारीला सरकारी व इतर माध्यमांच्या पातळीवर पुरेशी प्रसिद्धी मिळताना दिसत नाही. ती मिळाली तर नागरिकांचा आपल्या डॉक्टरांवरचा, आरोग्य कर्मचाऱ्यांवरचा विश्वास अधिक वाढेल आणि सातत्याने भीतीच्या सावटाखाली वावरणाऱ्या नागरिकांनादेखील काहीसा दिलासा मिळेल.’ असे राज यांनी म्हटले आहे.

आजार नियंत्रणात आहे हे दाखवले गेले तर नागरिक लगेच बाहेर पडतील हा समज चुकीचा आहे, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने लोकांना सोशल मीडियातून संबोधित करत दिलासा देत आहेत.

अलीकडेच फेसबुकच्या माध्यमातून राज्याला संबोधित करताना, कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात राजही माझ्यासोबत असल्याचे विधान मुख्यमंत्री उद्धव यांनी केले होते. दोन्ही नेत्यांमध्ये वेळोवेळी चर्चाही होत असल्याचे सांगितले जात होते. त्यातच राज यांनी केलेल्या आवाहनाला मुख्यमंत्री ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि प्रशासनाकडून त्याची तातडीने अंमलबजावणी होईल याचीही दक्षता घेतल्याचे दिसून आले आहे.

आजवर कोरोनाबाबत प्रशासनाकडून विविध आकडेवारी जारी केली जात असे. मात्र, यात बरे झालेल्या रुग्णांची एकत्रित माहिती अथवा याबाबतच्या सकारात्मक घटनांचा उल्लेख नसे. परंतु, आज याबाबतच्या आकडेवारीसह दिलासादायक प्रसिद्धिपत्रक जारी करण्यात आले.

‘आनंदाची बातमी’ या मथळ्याखाली हे पत्रक पाठविण्यात आले. कोरोनाच्या या लढाईत पक्षीय राजकारण आणि भेद बाजूला ठेवले जात आहेत. योग्य सूचना केल्या जात असून त्याची तातडीने दखलही घेतली जात असल्याची आनंदाची बाब मात्र यानिमित्ताने समोर आली आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur