काळजी वाढली:मुंबईत 308 कोरोना रुग्ण! एका दिवसांत 56 टक्क्यांची वाढ, राज्यात एकूण 4666 रुग्ण

0
291

गेल्या चार दिवसांत मुंबईत घटणारा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा घटणारा आकडा आज वाढून 308 वर पोहोचला. यामुळे मुंबईतील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 3032 वर पोहोचली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या या आकडेवारीनुसार एका दिवसात कोरोना रुग्णांमध्ये तब्बल 56 टक्क्यांची वाढ झाली आहे. दरम्यान, मुंबईत आज 53 पत्रकारांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. तर धारावीतही वाढ कायम राहिली असून आज 30 नवीन रुग्ण आढळल्याने या ठिकाणची कोरोनाबधितांची संख्या 168 वर पोहोचली. दरम्यान, मुंबईच्या स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रीय पथकही दाखल झाले आहे.

मुंबईत पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयासह विविध रुग्णालये आणि प्रयोगशाळांमध्ये कोरोना संशयितांची चाचणी करण्यात आली. यामध्ये हे 308 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. दरम्यान, गेल्या चार दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण घटत असल्याचे समोर आले होते. गेल्या आठवड्यात दोनशे पार गेलेला आकडा 18 एप्रिल रोजी 85 पर्यंत खाली आला होता. तर काल 9 एप्रिल रोजी 135 पर्यंत पोहोचला होता. मात्र आज हा आकडा 308 वर पोहोचला आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून रुग्णांचा वाढणारा आकडा हा प्रलंबित रिपोर्ट मिळत असल्याने वाढलेला दिसत असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

एका दिवसात 84 जण कोरोनामुक्त

मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढलेला दिसत असला तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही चांगलीच वाढत आहे. आज तब्बल 84 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचे पालिकेने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा 394 वर पोहोचला आहे. आज कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ही मुंबईतील आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. गेल्या काही दिवसांची आकडेवारी पाहता 7 एप्रिल रोजी 37, 18 एप्रिल रोजी 42 आणि 19 एप्रिल रोजी 29 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

धारावीचा आकडा 168 वर

धारावीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून गेल्या 24 तासात आणखी 30 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता धारावीतील एकूण रुग्णांची संख्या 168 वर पोहोचली असून यातील 11 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. कोरोनाचे नवे रुग्ण हे आधी कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या जवळच्या संपर्कातील (हाय रिस्क) व्यक्ती असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. धारावीत आज आढळलेल्या 30 रुग्णांमध्ये 5 जण शास्त्रीनगर, 3 जण 60 फुटी रस्ता परिसर, 3 जण कल्याणवाडी, कुंचिकुरवे नगर 2, नाईकनगर 2 तर 8 जणांचे राहण्याचे ठिकाण समजू शकलेले नाही. ढोरवाडा, मिनाजुद्दीन खान गाला, पीएमजीपी कॉलनी, पद्मागोपाल चाळ, माटुंगा लेबर कॅम्प, काळा किल्ला, मुकुंदनगर येथे प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे.

दादरमध्ये आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह

दादर परिसरात आज आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. रानडे आणि न. चिं. केळकर रोडवरील 29 आणि 46 वर्षांच्या पुरुषांचा तर गोखले रोडवरील 24 वर्षाच्या महिलेचा आज कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दादरमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 22 रुग्ण सापडले असून त्यात शुश्रूषा रुग्णालयातील 6 परिचारिका आणि दोघा डॉक्टरांचा समावेश आहे. त्यामुळे दादरमधील कोरोना रुग्णांची संख्या आता 25 वर पोहोचली आहे.

सात जणांचा मृत्यू

पालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत मुंबईत सात जणांचा मृत्यू झाला आहे. यातील सहा जणांना दीर्घकालीन आजार होते तर एकाला वार्धक्य होते अशी माहिती पालिकेच्या आरोग्य खात्याकडून देण्यात आली. या सात मृत्यूंमुळे एकूण मृतांचा आकडा 138 वर पोहोचला आहे

Best IT Comany In Maharashtra , Solapur