कागदी घोडे नाचवण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवणे महत्त्वाचे – एकनाथ शिंदे
सुरज गायकवाड
ग्लोबल न्यूज : ठाणे शहरातील आरोग्य विभागाच्या कार्यशैलीवरून तसेच उद्भवलेल्या कोरोनाच्या परिस्थिती संदर्भात पालकमंत्री तथा मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी एकनाथ शिंदेंनी वरचा सूर लावत लोकांच्या तक्रारीवरून अधिकाऱ्यांना चांगलंच झापले. कागदी घोडे नाचवण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवणे महत्त्वाचे आहे. त्यानुसार काम व्हायला हवं, असे एकनाथ शिंदे म्हणाले.


या बैठकीला एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्के, भाजपचे प्रमुख पदाधिकारी तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी महापालिकेच्या ढिसाळ कारभाराबाबत लोकांनी अनेक तक्रारी केल्या होत्या या आलेल्या तक्रारींवर शिंदेंनी चांगलेच महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते.
कागदी घोडे नाचवायचे बंद करून रूग्णांना उचार कसे मिळतील, हे पाहायला हवं. रूग्णवाहिका लवकरात लवकर कशी उपलब्ध होईल, याकडे ध्यान द्यायला हवं. अॅम्बुलन्सचे जे दर निश्चित केले आहेत त्यानुसारच ते घेण्यात यावेत तसंच खासगी हॉटेल आणि रूग्णांलयांमधली लूट बंद करण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या.

दरम्यान, ही बैठक संपल्यानंतर शिवसेनेच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांची भेट घेऊन चांगल्या आणि सक्षम अधिकाऱ्यांची फैज ठाण्यात आणावी, अशी मागणी करण्यात आली होती या मागणीला शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता.