औरंगाबाद | कोरोनाबाधित गारखेडा येथील गुरुदत्त नगर 47 वर्षीय वाहन चालकाचा शुक्रवारी सकाळी सहा वाजेदरम्यान मृत्यू झाला. 27 एप्रिलपासून त्यांच्यावर घाटी रुग्णालायातील कोव्हीड क्रीटीकल केअरच्या आयसीयूत त्यांच्यावर उपचार सुरु होते. या मृत्यूमुळे बाधीतांच्या मृत्यूचा आकडा आठ झाला आहे. अशी माहीती रुग्णालयाचे माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली.

व्यवसायाने वाहन चालक असलेल्या गुरू दत्तनगर येथील या रूग्णास सात दिवसांपासून ताप, कोरडा खोकला आणि चार दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. संबंधित लक्षणे कोविड 19 आजाराची दिसत असल्याने त्यांना संशयित कोविड कक्षात भरती केले होते. तिथे त्यांच्या लाळेचे नमुने घेऊन चाचणीसाठी पाठविल्यानंतर तो अहवाल पॉझिटिव्ह आला.

त्यानंतर त्यांना कोविड कक्षात हलविण्यात आले. तिथे त्यांना कृत्रिम ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. न्यूमोनिआ, श्वसन विकार असल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असेही घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी कळविले आहे. सध्या शहरातील कोरोना बाधितांचा आकडा 177 एवढा आहे. तर मृतांची संख्या 8 वर गेली आहे.