देशभरात संपूर्ण लॉकडाऊन असूनही दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण आढळत आहेत. देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. यादरम्यान देशातील अनेक नागरिकांच्या मनात कोरोनावरून अनेक वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत. ‘आज तक’ वृत्तवाहिनीशी बोलताना दिल्ली येथील एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया यांनी अशाच काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. यामध्येच असा एक प्रश्न आहे की, कार किंवा घरात एसी सुरू ठेवल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो का?

यावर उत्तर देताना डॉ रणदीप गुलेरिया म्हणाले, क्रॉस वेंटिलेशन असल्यास एसी चालविणे धोक्याचे ठरू शकते. आपल्या घरात विंडो एसी असल्यास आपल्या खोलीतील हवा त्या खोलीपर्यंत राहील. म्हणूनच कारमध्ये एसी चालविण्यास कोणताही धोका नाही. परंतु सेंट्रल एसीमधून संसर्ग होण्याचा धोका असू शकतो. सेंट्रल एसीची हवा सर्व खोल्यांमध्ये जात असते.

अशातच कोणाला कोरोनाचा संसर्ग झाला असेल आणि ती व्यक्ती खोकली तर हवे वाटे हा संसर्ग इतर खोल्यांमध्ये ही पसरू शकतो. ते म्हणाले, जर तुमच्या घरात विंडो एसी आहे आणि ती घरातील फक्त एकाच खोलीमध्ये लागलेली आहे. तर तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही.

डॉ गुलेरिया यांनी सांगितले की, कोरोनाचे रुग्ण ज्या रुग्णालयात भरती आहेत, त्या रुग्णालयात सेंट्रल एसी आता बंद करून विंडो एसी बसवण्यात येत आहेत. कोरोना रूग्णांवर उपचार करणारे सर्व डॉक्टर आणि आरोग्यसेवा कर्मचारी पीपीई किट परिधान करतात. उन्हाळ्यात हे किट परिधान करून रुग्णांना पाहण्यास अडचण निर्माण होऊ शकते. म्हणून रुग्णालयात विंडो एसी बसविण्यात येत आहेत.