एपीएमसी मार्केटमूळे लोकांचे जीव धोक्यात घालू नका – गणेश नाईक
ग्लोबल न्यूज: एपीएमसी मार्केटमुळे नवी मुंबईतील जनतेचे जीव धोक्यात घालू नका, अशी मागणी भाजप आ. गणेश नाईकांनी केली आहे. नवी मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचे कारण हे नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती ( वाशी एपीएमसी मार्केट) आहे.
शहराला अन्नधान्य, भाजीपाला, फळे आणि इतर अत्यावश्यक सुविधा पुरवण्यासाठी बंद असलेले एपीएमसी मार्केट पुन्हा १८ मे रोजी सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांची आणि माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढली आहे. तसेच एपीएमसी मार्केटमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून लागू केलेले कोणतेही नियम पाळले जात नसल्याने कोरोनाचा संसर्ग होत असल्याचं दिसत आहे.

यावरून गणेश नाईक यांनी इशारा दिला. ते म्हणाले की, बाजार समितीने नियम पाळले नाही आणि पुन्हा कोरोनाचा आकडा वाढला तर मात्र मार्केट बंद करण्यासाठी रस्त्यावर उतरु. सोशल डिस्टन्सिंग पाळत मोर्चा काढण्यात येईल. त्यामुळे एपीएमसी मार्केटच्या गैरजबाबदारपणामुळे स्थानिकांचा जीव धोक्यात घालू नका, अशी मागणी नाईक यांनी केली.
दरम्यान गणेश नाईक यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटच्या धान्य आणि मसाला मार्केट,नवी मुंबई मनपाच्यावतीने सिडको एक्झिबेशनमध्ये उभारण्यात येणाऱ्या ११५० बेडच्या हाॅस्पिटलला भेट दिली. यावेळी त्यांनी राज्यातून जाणाऱ्या परप्रांतीयांची भेट घेत काही सूचना केल्या.