नवी दिल्ली: तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी काल असा दावा केला होती की, त्यांचे राज्य एप्रिलपर्यंत कोरोनामुक्त होईल. परंतु हैदराबादपासून सुमारे १५०० किलोमीटर अंतरावर असलेल्या दिल्लीच्या निजामुद्दीन औलिया दर्ग्यातून आलेली बातमी ही त्यांच्यासह सर्वच राज्यांसाठी भयंकर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील निजामुद्दीन येथील औलिया दर्ग्यातील तबलीगी जमातच्या मरकजमध्ये हजारों लोक सहभागी झाले होते. या वृत्ताला तेव्हा दुजोरा मिळाला जेव्हा तेलंगणात कोरोना संसर्गामुळे ६ जणांचा मृत्यू झाला. हे सहाही जण निजामुद्दीनमधील औलियातील तबलीगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
तबलीगी जमात, मरकज आणि निजामुद्दीन औलिया दर्गा
या बातमीनंतर वेगवेगळ्या राज्य सरकारांनी तात्काळ पावलं उचलली आहेत, तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये १२०० लोकांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. तर यूपी पोलिस मुख्यालयाने १८ जिल्ह्यांसाठी विशेष निर्देश दिले आहेत की, त्या लोकांवर लक्ष ठेवावे किंवा त्या लोकांना शोधून काढावे जे या तबलीगी जमातच्या कार्यक्रमात सामील झाले होते. सोमवारी आरोग्य मंत्रालयाचे सहसचिवांनी सांगितले की, देशात कोरोना सध्या लोकल ट्रान्समिशनच्या टप्प्यात आहे. त्यामुळे आपण काळजी घेणं गरजेचं आहे. दरम्यान, तबलीगी जमात आणि मरकज याचा नेमका अर्थ काय हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत.
तबलीगी जमात म्हणजे नेमकं काय?
‘तबलीगी’चा अर्थ आहे अल्लाहने सांगितलेल्या गोष्टींचा प्रचार करणं आणि ‘जमात’चा अर्थ गट असा आहे.
म्हणजेच ‘तबलीगी जमात’ याचा अर्थ असा होतो की, एक असा समूह जो अल्लाहच्या गोष्टींचा प्रचार आणि प्रसार करतो. असं मानलं जातं की, जगात जवळपास जमातचे जगभरात जवळजवळ १५ कोटी सदस्य आहेत.

मरकजचा अर्थ काय?
यासोबतच, ‘मरकज’चा अर्थ हा की, अशी जागा जिथे या संदर्भात बैठक आयोजित केली जाते. तबलीगी जमातशी संबंधित सदस्य पारंपरिक इस्लामचे विचार पुढे नेण्याचा दावा करतात.
१९२७ मध्ये तबलीगी जमातची स्थापना
तबलीगी जमातची सुरुवात १९२७ मध्ये मुहम्मद इलियास अल कांधलवीने भारतात केली होती. हरियाणाच्या नूंह जिल्ह्यातून ही चळवळ पुढे आली होती. जमातची मुख्य उद्दीष्टे म्हणजे ‘छ: उसूल’ (कलिमा, सलात, इल्म, इक्राम-ए-मुस्लिम, इख्लास-ए-निय्यत, दावत-ओ-तबलीग) आहे. त्यांची आशियामध्ये मोठी लोकसंख्या आहे. जमातचे मुख्यालय निजामुद्दीन येथे आहे. या गटाची सुरुवात १९२७ मध्येच झाली होती. पण याची मोठी बैठक होण्यास सुमारे १४ वर्षे लागली आणि १९४१ मध्ये एक मोठी बैठक झाली. १९४७ मध्ये देशाची फाळणी होण्यापूर्वी तबलीगी जमातने वेगवेगळ्या भागात आपली पाळेमुळे रोवली होती. हळूहळू ही चळवळ जगभर पसरली.