जिल्ह्यात शनिवार व रविवार दोन दिवस जनता कर्फ्यू…
नागरिकांनी घरात बसूनच प्रशासनाला सहकार्य करावे
– जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे
उस्मानाबाद- जिल्ह्यात दिनांक 2 एप्रिल रोजी उमरगा तालुक्यातील एक व लोहारा तालुक्यात एक असे एकूण दोन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले आहेत.त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात शनिवार दिनांक 4 एप्रिल व रविवार दिनांक 5 एप्रिल 2020 रोजी दोन दिवसाचा जनता कर्फ्यू जाहीर केला असून या कालावधीत नागरिकांनी आपल्या घरातच बसून राहावे व जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केले.


जिल्ह्यात या दोन दिवसाच्या जनता कर्फ्यू कालावधीत रुग्णालये, औषधी दुकाने, दूध व स्वस्त धान्य दुकाने सुरू राहतील मात्र इतर सर्व आस्थापना बंद राहतील याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी व घरातच थांबून राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी केले.त्याप्रमाणेच जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी स्वतःहून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे त्यांनी सूचित केले.
तसेच जिल्ह्यात दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत त्यामुळे जिल्ह्यात बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले नागरिक यांनी स्वतःहून आरोग्य तपासणीसाठी पुढे यावे.विशेषतः जिल्ह्यात इस्लामपूर मुंबई व दिल्ली येथून आलेल्या नागरिकांनी स्वतःहून वैद्यकीय तपासणी करून घ्यावी व आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे होम कोरंटाइनचे नियम पाळावेत.
या नागरिकांनी बाहेर फिरू नये, स्वतः व दुसऱ्याला धोका निर्माण होईल असे कोणतेही कृत्य त्या नागरिकांनी करू नये व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. शनिवार व रविवार या दोन दिवशी प्रशासनाने जाहीर केलेल्या जनता कर्फ्यू मध्ये प्रत्येक नागरिकांनी घरात बसून राहून कोरोना विषाणूचा प्रतिबंध करावा असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केले.