उसाच्या ट्रक्टरची धडक सायकलस्वार वृध्द ठार
बार्शी : सायकलवर गावाकडे निघालेल्या एका वृध्दास दोन ट्रॉलीमध्ये ऊस घेवून निघालेल्या ट्रॅक्टरने पाठीमागून धडक देवून चिरडल्याने वृध्दाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक पळून गेला. बार्शी-कुर्डूवाडी रस्त्यावर बारबोले पेट्रोलपंपाजवळ सायंकाळी ५.१५ च्या सुमारास ही घटना घडली.
वैजिनाथ गोविंद कदम (वय ६० रा खांडवी ता. बार्शी असे अपघातात ठार झालेल्या वृध्द व्यक्तीचे नांव आहे. मयताचा पुतण्या संतोष अजिनाथ कदम यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात ट्रॅक्टरचालकाविरोधात हयगयीने, अविचाराने वाहन चालवून मयतास कारणीभूत झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

वैजिनाथ कदम हे बार्शीहून कुर्डूवाडी रस्त्याने सायकलवर आपल्या गावी खांडवीकडे निघाले होते. त्याचवेळी त्याच रस्त्याने पाठीमागून ट्रॅक्टर एम एच २२ एएम ४५८३ हा दोन ट्रॉलीमध्ये ऊस घेवून कुर्डूवाडी रस्त्याने कारखान्याकडे निघाला होता. बारबोले पेट्रोलपंपाजवळ अपघात झाला. वैजिनाथ कदम यांच्या अंगावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने ते जखमी होवून जागीच मयत झाले होते.
ट्रॅक्टर कांही अंतरावर जावून थांबलेला होता. ट्रॅक्टरचालक अपघातानंतर जखमीस मदत करण्याऐवजी पळून गेला. मयताच्या पुतण्यास फोनवरून अपघाताचे वृत्त समजल्यानंतर तो घटनास्थळी आला असता त्यांचे चुलते वैजिनाथ यांचे कमरेवरून चाक जावून जखमी होवून मयत झाल्याचे दिसले. सायकल ट्रॅक्टरच्या डाव्या बाजूस पडलेली होती. संतोष कदम यांनी फिर्याद दिली. अधिक तपास तालुका पोलीस करत आहेत.