“उद्धव साहेब,
मी आज नमाज सोडून तुमचं भाषण ऐकतो आहे. कारण, तुम्हीच आमचे नेते आहात. आम्ही तुमच्यासोबत आहोत.”
“आमच्या भारतनगरमध्ये अजून नमाज सुरू आहेत, त्यांच्यावर ॲक्शन घ्या. जे चुकतील, सामूहिक नमाजासाठी बाहेर पडतील आणि ‘डिस्टन्सिंग’चे नियम विसरतील, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत.”
अशा आशयाच्या प्रतिक्रिया आहेत, मुख्यमंत्र्यांच्या ताज्या ‘फेसबुक लाइव्ह’वर.
आणि, अशी ही एखादी वा अपवादात्मक प्रतिक्रिया नाही. प्रतिक्रिया देणारी ही साधी माणसे आहेत. ‘पेड’ लोक नाहीएत. या सगळ्या कमेंट्स तुम्ही बघू शकता. त्या ‘पब्लिक’ आहेत. ही माणसे ‘खरीखुरी’ आहेत. या कमेंट्स दहशतीतून वा नाईलाजानं आलेल्या नाहीत.
उद्धव ठाकरे यांच्या ‘फेसबुक लाइव्ह’च्या निमित्ताने आज हा एक वेगळाच मुद्दा पुढे आला.
औरंगाबादच्या एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी आज ‘लाइव्ह’ बोलत होतो. तेव्हा, एका विद्यार्थ्याने हा मुद्दा मांडला.
‘उद्धव ठाकरे ‘फेसबुक लाइव्ह’ करत असतात, तेव्हा ज्या कमेंट्स येतात, त्यात चारपैकी एक कमेंट मुस्लिम माणसाची असते. त्याशिवाय बौद्ध आणि ख्रिश्चन व्यक्तींच्या कमेंट्सही मोठ्या प्रमाणात असतात.’
मग जरा खोलात गेलो.
हे खरेच थक्क करणारे आहे.
शिवसेना, एवढी वर्षे मुंबईवर राज्य करते हे खरे, पण मुंबई महापालिकेच्या २२७ नगरसेवकांपैकी मुस्लिमबहुल भागातील जागा मात्र शिवसेनेला सहसा मिळत नाहीत. विधानसभा निवडणुकीतही असा अनुभव येतो.
मुस्लिम प्रभागांत अपक्ष, समाजवादी पक्षाचे, एमआयएम अथवा कॉंग्रेसचे नगरसेवक होतात. मात्र, तिथे शिवसेना पराभूत होते. मुस्लिम मित्रांना शिवसेना आपली शत्रू वाटते, असेच आपण आजवर पाहात आलो आहोत. मुंबईत ‘सकाळ’चा संपादक असताना मी स्वतः हे जवळून पाहिले आहे.

औरंगाबादेत ‘बाण की खान’ यावरच तर आजवर शिवसेनेने राज्य केले! बौद्ध आणि ख्रिश्चनांची भूमिकाही शिवसेनेसंदर्भात फार वेगळी नव्हती. त्याला तशी स्वाभविक कारणेही होती. पण, ‘कोरोना’च्या संकटाला उद्धव ज्या पद्धतीने भिडत आहेत, त्यानंतर मात्र चित्र पूर्णपणे बदलले आहे.
हिंदूधर्मीयांसोबत सर्वांनाच उद्धव हे आपले नेते आहेत, असे वाटू लागले आहे. एकीकडे देशभर ‘हिंदू विरुद्ध मुस्लिम’ असे ‘नॅरेटिव्ह’ जोरकसपणे ‘सेट’ केले जात असताना, महाराष्ट्रात मात्र सर्वधर्मीयांना हे सरकार आपले आहे, मुख्यमंत्री आपले आहेत, असे वाटावे, हा कशाचा पुरावा आहे?
उद्धवच नव्हे, शिवसेनेचा हा नवा जन्म आहे.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, महाराष्ट्रासाठी, बदलणारे हे ‘नॅरेटिव्ह’ कमालीचे आश्वासक आहे.
‘कोरोना’ आज ना उद्या जाईल, पण उद्धव आणि शिवसेनेने ही भूमिका कधी बदलू नये.
हाच खरा महाराष्ट्र आहे. ही खरी मुंबई आहे. जिथे हिंदूहृदयसम्राटांची भूमिका करण्यासाठीही नवाजुद्दीन सिद्धीकी शोधावा लागतो, असा हा देश आहे! बाळासाहेबांपेक्षाही उद्धव आणि आदित्य यांची ही शिवसेना ख-या अर्थाने आश्वासक आहे.
ज्ञानेश्वर- तुकारामांच्या, गांधी-प्रबोधनकारांच्या संविधानवादी हिंदुत्वाची वाट उद्धव यांनी चोखाळणे हीच बदलाची नांदी ठरणार आहे.
“वो राम की खिचड़ी भी खाता है,
रहीम की खीर भी खाता है,
वो भूखा है जनाब उसे,
कहाँ मजहब समझ आता है!”
हे अंतिम सत्य विसरू नका उद्धव साहेब, मग महाराष्ट्र तुमचाच आहे!
- संजय आवटे
राज्य संपादक दिव्य मराठी