मुंबई : राज्यात कोरोना व्हायरस मुळे ‘लॉकडाऊन’असताना नियमांची पायमल्ली करत खंडाळ्यातून महाबळेश्वरला जाण्यासाठी मदत करणं, विशेष प्रधान सचिवांना भोवलं. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत गृह विभाग विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेत.

गुप्ता यांनी वाधवा बिल्डरला खंडाळ्यावरून महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगी कशी दिली याचीही चौकशी करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही तडकाफडकी कारवाई केली आहे. ‘मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनुसार अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्या’चे ट्विट अनिल देशमुख यांनी केले आहे. ‘गुप्ता यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे’ही देशमुख यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

‘लॉकडाऊन’ असतानाही गुरूवारी वाधवा बिल्डरच्या कुटुंबातील तब्बल २३ जण खंडाळ्यावरून महाबळेश्वरला गेले होते. ‘हे २३ जण आपले कौटुंबिक स्नेही आहेत. मी त्यांना ओळखतो’ असे पत्र गुप्ता यांनी दिले होते. पाच गाड्यांमधून या २३ जणांना प्रवास करण्याचीही परवानगी या पत्रात दिली होती.

देशात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे. असे असताना एका पर्यटनस्थळी जाण्यासाठी धनाढ्य बिल्डरला चक्क गृह विभागाच्या प्रधान सचिवांनीच परवानगी दिल्याने खळबळ उडाली होती. लॉकडाऊनच्या तीन तेरा वाजवत वाधवा कुटुंबियांची वरात खंडाळ्यावरून महाबळेश्वरला गेली. त्यावेळी पाचगणी पोलिसांनी त्यांना अडवले. पाचगणी पोलिसांमुळे अमिताभ गुप्ता यांचे पितळ उघडे पडले.
विशेष म्हणजे, वाधवा बिल्डर वादग्रस्त आहे. सीबीआयकडून त्यांच्या विरोधात चौकशी सुरू आहे. अशा वादग्रस्त व्यक्तीसोबत गुप्ता यांचे साटेलोटे कसे काय असाही सवाल उपस्थित झाला आहे. या प्रकाराविरोधात लोकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता. विरोधकांनीही सरकारवर सडकून टीका केली.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी गुरुवारी रात्री उशिरा चर्चा करुन गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. अनिल देशमुख यांनी रात्री दोन वाजता या संदर्भात ट्विटरवरुन माहिती दिली. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सातारा पोलीस अधीक्षकांना फोन करुन वाधवान कुटुंबावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.