चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसचे युरोपीय देशांमध्ये हाहाकार उडवून दिला आहे. या व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची आणि मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जगभरात गेल्या दोन ते तीन दिवसात कोरोना व्हायरसमुळे 4 ते 5 हजार लोकांचा मृत्यू झाला असून यातील बहुतांश इटली, स्पेन, ब्रिटन आणि अमेरिका या देशातील आहेत. स्पेनमध्येही कोरोनाचा धुमाकूळ सुरू असून परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.
चीननंतर इटली या शहरात कोरोनाचा कहर पाहायला मिळाला. येथे मृतांचा आकडा 6 हजार पार गेला आहे. इटलीसह स्पेनमध्येही मृतांची संख्या 3 हजार पार झाली आहे. गेल्या 24 तासात येथे 700 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. स्पेनने कोरोना मृतांच्या आकडेवारीत चीनला मागे सोडले आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे 3281 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर स्पेनमधील मृतांचा आकडा 3434 झाला आहे.

स्पेनच्या सरकारने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 738 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 47610 झाली आहे. स्पेनची राजधानी माद्रिद येथे कोरोनाचा सर्वाधिक प्रकोप पाहायला मिळत असून येथे 1535 लोकांचा जीव गेला आहे. सामान्य लोकांसह हा व्हायरस आरोग्य कर्मचारी वर्गातही वेगाने पसरत असून जवळपास 5400 आरोग्य कर्मचाऱ्याना कोरोनाची लागण झाली आहे.
स्पेनमधील परिस्थिती एवढी खराब झाली आहे की रुग्णालयात लोकांना प्रायोरिटीनुसार उपचार केले जात आहेत. अनेक वृद्धाश्रममध्ये संसर्गग्रस्त लोकांवर उपचार करणे कठीण झाले असून घरात मृतदेह अक्षरशः सडू लागले आहेत. स्पेनच्या संरक्षण मंत्री मार्गारिटा रोबल्स यांनी सांगितले की, वयोवृद्ध लोकांना आहे त्या परिस्थितीत सोडून देण्यात आले आहे. काहीचा बेडवरच मृत्यू झाला आहे. तरुण लोकांना वाचवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असेही त्या म्हणाल्या. अनेक नर्सिंग होममध्ये मृतदेह मिळत असून रुग्णालयात किती मृतदेह पडून आहेत याबाबत त्यांनी माहिती दिली नाही.