नवी दिल्ली | कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मोठ्या बँकेच्या डिफॉल्टर्सची नावे सरकारने लपविल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे. संसदेत आपल्या प्रश्नाचा संदर्भ देताना राहुल म्हणाले की, आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नीरव मोदी, मेहुल चोकसी यांच्यासह भाजप मित्रांची नावे बँक चोरांच्या यादीत टाकली आहेत.
राहुल गांधी यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, ‘मी संसदेत एक साधा प्रश्न विचारला – मला देशातील 50 सर्वात मोठ्या बँक चोरांची नावे सांगा. अर्थमंत्र्यांनी उत्तर देण्यास नकार दिला. आता आरबीआयने बँक चोरांच्या यादीत नीरव मोदी, मेहुल चोकसी यांच्यासह भाजपच्या मित्रांची नावे समाविष्ट केली आहेत. म्हणूनच हे सत्य संसदेत दडलेले होते.


मार्च च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत बँकिंग घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी सरकारकडे देशातील 50 मोठ्या डिफॉल्टर्सविषयी माहिती मागितली होती. प्रश्नोत्तराच्या वेळी कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी विचारले होते की, ‘मी सरकारला एक सोपा प्रश्न विचारला की देशाचे 50 डिफॉल्टर्स कोण आहेत? मला काही उत्तर दिलेले नाही.