आमदार अंबादास दानवे यांच्या मदतीमुळे गरजू महिलेला मिळाला आधार
सुरज गायकवाड
ग्लोबल न्यूज: सध्या संपूर्ण राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. अनेकांना जीवनावश्यक सुविधा मिळवण्यासाठी देखील प्रचंड प्रमाणावर समस्या निर्माण होत आहेत. अशात सरकार व प्रशासन गरजू नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. औरंगाबाद मध्ये मात्र याबाबतीत एक कौतुकास्पद प्रसंग पाहायला मिळाला.

औरंगाबादमधील क्रांती चौक या महत्वाच्या भागात एक महिला पंधरा दिवसांपासून तिच्या लहान बाळाला घेऊन रस्त्याच्या बाजूला राहत होती. तिला अनेकांनी जेवण आणि इतर हव्या असणाऱ्या वस्तू देखील आणून दिल्या पण कुणीही तिच्या समस्येबद्दल विचारणा केली नाही.

मात्र शिवसेना आमदार व जिल्हाध्यक्ष अंबादास दानवेंनी या महिलेला असहाय्य परिस्थितीत बघताच स्वतःहून तिची विचारपूस केली. विचारपूस केली असता सदर महिलेने घर मालकाकडून घर भाड्यासाठी वारंवार होणारी मागणी आणि इतर गोष्टीची समस्या असल्याचे सांगितले. घर मालकाकडून ‘घर भाडे द्या नाहीतर घर रिकामं करा’, अशा भाषेत देखील भाड्यासाठी मागणी केली जात होती आणि त्यामुळेच घर सोडल्याचे महिलेने सांगितले.

अंबादास दानवे यांनी क्षणाचाही विलंब न करता महिला राहत असलेल्या भागातील नगरसेवक अश्फाक कुरेशी यांना बोलवून घेतले. तुमच्या भागातील त्या घर मालकाशी बोलून महिलेची समस्या सोडवावी, अशी सूचना देखील त्यांनी केली.
विशेष म्हणजे अंबादास दानवेंनी फक्त छतच नव्हे तर त्या महिलेला जीवनावश्यक वस्तू म्हणजे रेशन वगैरे वस्तू देखील उपलब्ध करून दिल्या. दानवेंनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे या महिलेला समाधानाने तिच्या घरी जाता आले व तिच्या लहान बाळाची चिंता देखील त्यांनी मिटली असल्याने अंबादास दानवेंच्या कामाची चर्चा होत आहे.