सांगली । कोर्टाची नोटीस आली आहे, इलेक्शन लढत असताना जसा लोकांवर माझा विश्वास होता, त्याच प्रकारे न्यायव्यवस्थेवरही माझा विश्वास आहे. मी कुठल्याही चुकीच्या पद्धतीने इलेक्शन लढलो नाही, हे मला माहिती आहे, लोकांना माहिती आहे. तसेच न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. विजय हा सत्याचाच होईल. त्या ठिकाणी माझी बाजू योग्य असेल असं मला या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगायचं आहे. अस मत आमदार रोहित पवार यांनी मांडले आहे.
दरम्यान, माजी मंत्री राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्या आमदारकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत तसेच रोहित पवार यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी करत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. यानंतर खंडपीठाने आमदार रोहित पवार यांच्यासह आणखी 14 उमेदवारांना नोटीस पाठवली आहे.

राम शिंदे यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, मतदानाच्या आदल्या दिवशी कोरेगाव या गावामध्ये आमदार रोहित पवार यांचे दोन प्रतिनिधी मतदारांना पैसे वाटत होते. मतदारांमध्ये पैशांचे वाटप करुन रोहित पवार यांनी निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे. मतदारांमध्ये पैसे वाटल्यामुळे निवडणुकीच्या निकालावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे रोहित पवारांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.