ग्लोबल न्यूज – जगभरात जीवघेण्या ‘कोरोना’वर लस शोधण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु असताना अमेरिकेतून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोविड-19 या विषाणूवरील लसीच्या विकासात आशेचा किरण दिसल्याचा दावा ‘मॉडर्ना’ बायोटेक्नॉलॉजीकल कंपनीने केला आहे.

‘मॉडर्ना’ बायोटेक्नॉलॉजीकल कंपनीने लसीच्या चाचणीचे प्राथमिक निकाल आशादायक असल्याचा दावा केला आहे. मॉडर्नाने तयार केलेल्या लसीचा डोस आतापर्यंत आठ जणांना देण्यात आला आहे. त्यानंतर या रुग्णांच्या प्रतिकारशक्तीचा प्रतिसाद वाढल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जगात ‘कोरोना’वरील पहिली लस सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दुसऱ्या टप्प्यात मोडर्ना 600 तंदुरुस्त स्वयंसेवकांवर mRNA-1273 लसीची चाचणी करणार आहे. 600 स्वयंसेवकांपैकी निम्मे 18 ते 55 वयोगटातील तर उर्वरित 55 च्या पुढच्या वयोगटातील असतील.

mRNA-1273 लसीद्वारे करोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीला चालना देण्यात येईल. जुलै महिन्यात तिसऱ्या टप्प्यात 1000 लोकांवर चाचणी करण्यात येईल. FDA ने दुसऱ्या फेजसाठी मोडर्नाला परवानगी दिली आहे.

मॉडर्ना ही RNA आधारित लसीची मानवी चाचणी करणारी पहिली औषध कंपनी आहे. कंपनीचा तिसरा टप्पा यशस्वी झाला तर कंपनी लस बनवण्यासाठी अर्ज करु शकते. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मॉडर्नाला चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यास सुरुवात करण्याची मान्यता दिली आहे.

नोव्हाव्हॅक्स ही अमेरिकन कंपनी सुद्धा लवकरच लसीच्या मानवी चाचण्या सुरु करणार आहे. सध्याच्या घडीला कोविड-19 ची लस सर्वांसाठीच महत्वाची आहे. जगात जवळपास 100 संशोधकांचे गट कोरोनाला रोखणारी लस शोधून काढण्यासाठी संशोधन करत आहेत.
काही दिवसांपूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक टेड्रॉस अॅडॅनॉम यांनी लवकरच कोरोनावर लस मिळेल असं सांगितलं होतं. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेला त्यांनी ही माहिती दिली होती. टेड्रॉस यांच्या म्हणण्यानुसार बर्याच देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे आणि सुमारे 100 वेगवेगळ्या टीम लसीची चाचणी घेत आहेत आणि त्यातील 8 लसीचा शोध घेण्याच्या अगदी जवळ आले आहेत. सध्या एकूण 7 ते 8 टीम ही लस तयार करण्याच्या अगदी जवळ आहे आणि लवकरच जगाला एक चांगली बातमी मिळेल, असं ते म्हणाले होते.