ग्लोबल न्यूज- देशात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान शुक्रवारी मान्सूनच्या रुपात एक आनंदाची बातमी समोर आली आहे. खासगी हवामान विषयक संस्था स्कायमेटने देशात मान्सूनने आगमन केल्याची घोषणा केली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) याची अधिकृतरित्या घोषणा केलेली नाही.

मान्सूनने शुक्रवारी केरळच्या तटवर्ती भागात आगमन केले आहे. सामान्यपणे देशात 1 जूनला मान्सून केरळमध्ये येत असतो. परंतु यंदा वेळेपूर्वीच तो भारतात आला आहे. यावर्षी सामान्य मान्सूनचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्यामुळे आर्थिक आघाडीवर देशाला मोठा दिलासा मिळण्याचे संकेत आहेत.

आयएमडीने यापूर्वीच यंदा १०० टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये 5 टक्क्यांची वाढ किंवा कपात होऊ शकते. मागीलवर्षी 8 जूनला मान्सूनने केरळमध्ये प्रवेश केला होता. यावेळी 30 मे रोजीच त्याचे आगमन झाले आहे.
चांगला मान्सून भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा आहे. आधीच अर्थव्यवस्था मंदावली आहे. त्यावर आणखी कोरोना विषाणूमुळे भारतासह संपूर्ण जगातील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. आता मान्सूनमुळे देशातील मंदी कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
भारतात दक्षिण-पश्चिम मान्सून दरवर्षी जून ते सप्टेंबर असा 4 महिने असतो. सर्वांत आधी तो केरळमध्ये येतो. त्यानंतर देशातील वेगवेगळ्या भागात जातो. अशाच पद्धतीने देशातील विविध भागात वेगवेगळ्या वेळी तो परत जातो.