काही लोक टीव्हीवर येण्यासाठी, बातम्या होण्यासाठी अशी वक्तव्य करतात – आ. रोहित पवार
मुंबई, २५ जून : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांबाबत धक्कादायक विधान केल्याने समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं होतं की, “शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत.

राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे” असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.

खालच्या पातळीवरचं हे राजकारण पाहिलं की दु:ख होतं आणि चीडही येते. पण त्यात लोकांचा फायदा नाही म्हणून आम्ही त्याकडं दुर्लक्ष करतो,’ असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, “गोपीचंद पडळकर ज्या पक्षातले आहेत त्या पक्षाचे महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस आहेत. वक्तव्य केल्यानंतर काही वेळानंतर त्यांच्याच नेत्यांनी त्यांना झापलं असं आम्हाला कळालं. गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या नेत्यांकडून शिकलं पाहिजे. त्यांच्या नेत्यांनी सांगितल्यावर आम्ही काय बोलणार. काही लोक टीव्हीवर येण्यासाठी, बातम्या होण्यासाठी अशी वक्तव्य करत असतात. ओघाच्या नादात आपण काय बोलतोय हे विसरुन जातात. ओघाच्या नादात त्यांच्याकडून चूक झाली असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे”.