बार्शी (जि. सोलापूर) ः कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सोयाबीन पिकाच्या आलेल्या पट्टीची रक्कम मोजत असताना चतुर्भुज पाटील (वय 65, रा. रुई, ता. बार्शी) यांच्या हातातील पाच हजार रुपये व सोन्याची अंगठी लंपास केल्याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितास अटक करून बार्शी न्यायालयात उभे केले असता न्यायदंडाधिकारी दडके यांनी त्यास सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
मिसमअली आजमअली (वय 27), असे पोलिस कोठडी मिळालेल्याचे नाव आहे. मिसमअली तसेच इमरान अली (दोघे रा. बिदर, कर्नाटक) या दोघांवर गुन्हा दाखल झाला होता. पाटील यांनी फिर्याद दाखल केली होती.

मंगळवारी गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी रात्री आठच्या दरम्यान पोलिस पथक तयार करून बाजार समिती आवार पिंजून काढला. पथकातील पोलिस उपनिरीक्षक प्रेमकुमार केदार, हवालदार चंद्रकांत आदलिंगे, इसाक सय्यद, चंद्रकांत घंटे, संताजी अलाट, ज्ञानेश्वर घोंगडे, अजित वरपे, नारायण शिंदे यांना लाल दुचाकीवर दोघे संशयित दिसले.
मार्केट यार्ड आवारापासून तुळजापूर रस्त्याने दोघांचा पाठलाग पोलिसांनी ओढ्यापर्यंत केला. दुचाकी टाकून देऊन पळून जात असताना मिसमअली आजमअली यास पकडण्यात पोलिसांना यश आले. त्याचा साथीदार उसाच्या शेतामधून पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे पाच हजार रुपये सापडले. त्याची दुचाकी (केए 39 आर 3691) जप्त करून त्यास अटक केली आहे. दुसऱ्या संशयितास अटक करण्यासाठी पथक बिदरकडे रवाना झाले.