अखेर उद्धव ठाकरे झाले आमदार ;विधानपरिषद द्वैवार्षिक निवडणूक बिनविरोध ,सोमवारी घेणार शपथ
ग्लोबल न्युज: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या अंतिम मुदतीमध्ये १३ पैकी ४ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ९ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली, अशी माहिती अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवार दिनांक १८ मे रोजी दुपारी १ वाजता विधान परिषद सभापतींच्या उपस्थितीत विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेणार आहे.
महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या ९ रिक्त जागांवर २१ मे रोजी निवडणुका होणार होत्या. परंतु याची गरज भासली नाही, कारण ३ उमेदवारांनी आपली नावे मागे घेतली आहेत. त्यानंतर आता केवळ ९ उमेदवारच मैदानात उरले असल्याने, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड झाली आहे.

उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर सहा महिन्याच्या अवधीमध्ये त्यांना विधानसभा किंवा विधानपरिषदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य म्हणून निवडणे आवश्यक होते. आज विधानपरिषदेचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. महाराष्ट्रातील विधानपरिषदेत बिनविरोध निवड झालेल्या ९ सदस्यांमध्ये शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचे दोन, कॉंग्रेसचे एक आणि भाजपच्या चार सदस्य यांचा समावेश आहे.
विधानसभा सदस्यांद्वारे निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या एकूण ९ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. त्यासाठी दाखल १४ उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांपैकी एका उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले होते.

नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिनांक होता. १३ उमेदवारांपैकी डॉ. अजित माधवराव गोपछडे (भारतीय जनता पार्टी), श्री. संदीप सुरेश लेले (भारतीय जनता पार्टी), श्री. किरण जगन्नाथ पावसकर (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), श्री. शिवाजीराव यशवंत गर्जे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी) या चार उमेदवारांनी दि.१२ रोजी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले.

विधानपरिषद सदस्यपदी बिनविरोध निवड झालेले सदस्य पुढीलप्रमाणे
श्री. गोपीचंद कुंडलिक पडळकर (भारतीय जनता पार्टी), श्री. प्रवीण प्रभाकरराव दटके (भारतीय जनता पार्टी), श्री. रणजितसिंह विजयसिंह मोहिते- पाटील (भारतीय जनता पार्टी), श्री. रमेश काशिराम कराड (भारतीय जनता पार्टी).

श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना), डॉ. नीलम दिवाकरराव गोऱ्हे (शिवसेना).
श्री. शशिकांत जयवंतराव शिंदे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), श्री. अमोल रामकृष्ण मिटकरी (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी).
श्री. राजेश धोंडीराम राठोड (इंडियन नॅशनल काँग्रेस).